किलीमांजारो शिखरावर सर्वांत मोठा तिरंगा फडकावला, लातूरच्या दीपकची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:37 AM2018-07-10T05:37:57+5:302018-07-10T05:38:12+5:30
लातूर जिल्ह्यातील दीपक कोनाळे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलीमांजारो’ यशस्वीरित्या सर केले़ त्याने ४ जुलै रोजी पहाटे या शिखरावर भारताचा ३.६० मीटर उंची आणि ६.८० मीटर रूंदीचा तिरंगा ध्वज फडकावला.
देवणी (जि़ लातूर) : लातूर जिल्ह्यातील दीपक कोनाळे याने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलीमांजारो’ यशस्वीरित्या सर केले़ त्याने ४ जुलै रोजी पहाटे या शिखरावर भारताचा ३.६० मीटर उंची आणि ६.८० मीटर रूंदीचा तिरंगा ध्वज फडकावला. भारताचे राष्ट्रगीत गात हेल्मेट वापराचा संदेशही त्याने तेथून दिला.
विश्वविक्रमी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, गिर्यारोहक बालाजी जाधव, निखिल यादव आणि सागर भारती यांनी स्थापन केलेल्या ३६० एक्सप्लोरर ग्रुपद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. किलीमांजरो हे शिखर आफ्रिकेतील टांझानियात समुद्रसपाटीपासून १९,३४१ फुट उंचीवर आहे़ एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी १५ आॅगस्ट २०१५ रोजी हे शिखर सर केले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दीपकने ही कामगिरी केली. शून्याच्याखाली तापमान, प्रचंड वारे, उभी चढण या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक त्याने ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्याने २९ जून रोजी सुरुवात केली होती. आगामी काळात ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून युरोप व आॅस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च माउंट एलब्रुस शिखर सर करणार असल्याचे दीपक म्हणाला़ त्यास पुण्यातील जेष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे मार्गदर्शन लाभले़
दीपक हा मुळचा देवणी तालुक्यातील सिंधीकामट येथील रहिवासी असून वडील पोलीस खात्यात नोकरीला असल्याने त्याचे प्राथमिक शिक्षण हिंगोली येथे तर माध्यमिक शिक्षण जालना येथे झाले़ बीक़ॉमचे शिक्षण हिंगोलीत पूर्ण करुन पुणे येथे तो सध्या युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे़
‘लिमका बुक’कडे प्रस्ताव
दीपक कोनाळेच्या या कामगिरीचा प्रस्ताव लिमका बुक आॅफ रेकॉर्डसाठी पाठविला जाणार असल्याचे विश्वविक्रमी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची मोहीम
ही माझ्यासाठी सर्वांत महत्वाची मोहीम होती. शेवटच्या चढाईवेळी कमी तापमानात आणि अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ही चढाई पूर्ण केली़ भारताचा सर्वात मोठा तिरंगा ध्वज किलीमांजारो शिखरावर घेऊन गेलो़ जेव्हा मी राष्ट्रगीत गात होतो, त्यावेळी माझ्यासाठीचा खूप भावूक क्षण होता. - दीपक कोनाळे