पुणे, लातूर जिल्ह्यातून बाईक चोरणारा गजाआड; २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
By हणमंत गायकवाड | Published: July 18, 2022 05:32 PM2022-07-18T17:32:04+5:302022-07-18T17:32:52+5:30
चाकूर तालुक्यात राहणाऱ्या एका संशयित आरोपीने मोटारसायकल घरी लपवून ठेवल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती.
लातूर: मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थापन केलेल्या विशेष पथकाने लातूर व पुणे येथून चोरलेल्या पाच मोटारसायकली जप्त करून एका आरोपीला अटक केली. लातूर, निलंगा, अहमदपूर आणि पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली या आरोपीने पोलिसांना दिली आहे.
चाकूर तालुक्यात राहणाऱ्या एका संशयित आरोपीने मोटारसायकल घरी लपवून ठेवल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील घरी छापा टाकला असता, तुकाराम ईश्वर आवळे (२१) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने लातूर जिल्ह्यातील लातूर, निलंगा, अहमदपूर तसेच पुणे जिल्ह्यातील कात्रज व भोसरी या ठिकाणांवरून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या घरातील मोकळ्या जागेत दुचाकी ठेवल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी मोटारसायकलच्या चेसिस नंबर, इंजिन नंबरची पडताळणी केली असता, चोरीच्या गुन्ह्यातील मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले. गांधी चौक पोलीस ठाणे, निलंगा पोलीस ठाणे, अहमदपूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तसेच पुणे जिल्ह्यातील कात्रज आणि भोसरी येथून चोरी केलेली प्रत्येकी एक मोटारसायकल असल्याचे तपासणीत उघड झाले. त्यावरून एकूण पाच मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, पुढील तपासासाठी आरोपीला गांधी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सचिन द्रोणाचार्य, सहायक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार राम गवारे, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, बंटी गायकावाड, नाना भोंग, चालक प्रवीण चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांनी परिश्रम घेतले.