टोमॅटोच्या पिकावर किडीचा हल्ला, ताेडणी नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 07:52 AM2022-03-12T07:52:14+5:302022-03-12T07:55:02+5:30
हिवाळ्यातील लागवडीपासून पंखाडे व अळीने टोमॅटोवर हल्ला केला आहे.
- बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि. लातूर) : मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने शासनाने एक जिल्हा, एक पीक योजनेत टोमॅटोची निवड केली आहे. मात्र, दाेन महिन्यांपासून या पिकावर पाने, फळ पाेखरणाऱ्या टुटा अळीने हल्ला केल्याने हजारो हेक्टरवरील पीक फस्त झाले आहे. त्यात शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
औराद शहाजानी, वडवळ ना.,जानवळ, नळेगाव, अंबुलगा, हेर, लातूर राेड, निटूर, सावरी, तगरखेडा, डाेंगरगाव, किल्लारी, औसा आदी भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेतात. जिल्ह्यातील टोमॅटोला दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, जम्मू- कश्मीर, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशात माेठी मागणी असते. पावसाळ्यात गावरान तर हिवाळा व उन्हाळ्यात वैशाली जातीच्या टोमॅटोची लागवड केली जाते.
हिवाळ्यातील लागवडीपासून पंखाडे व अळीने टोमॅटोवर हल्ला केला आहे. टुटा अळीचे पतंग हे लाखाेंच्या संख्येत शेतात येत आहेत. अळीचा सकाळच्यावेळी गोंगाट असतो. हे पतंग मोठ्या प्रमाणात अंडी घालत असून त्यातून अळी तयार हाेऊन ती पाने, फळे कात्रत आहे. नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करूनही फारसा उपयोग होत नाही.
कृषी विद्यापीठाचे शास्त्र व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबुलगा, औराद शहाजानी, तगरखेडा, हलगरा येथे भेटी पाहणी केली. पथकात शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे, डॉ. विनोद शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी महेश क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, हरिभाऊ नागरगोजे, गायकवाड, कृषी अधिकारी बावगे, मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील होते.शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेऊन उपाययोजनेवर चर्चा केली. टोमॅटोवरील टुटा अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुमने घेतले. त्यावर विद्यापीठात संशोधन केले जाणार असल्याचे डॉ. अरुण गुट्टे यांनी सांगितले.
अडीच महिन्यांत १४ फवारण्या...
औरादचे शेतकरी मुरली बाेडंगे म्हणाले, अडीच महिन्यात १४ फवारण्या केल्या. पण कीड नियंत्रणात आली नाही. टोमॅटोवर यावर्षीसारखी कीड मी २५ वर्षांत पाहिली नाही. उत्पादन निघालेच नाही, उलट कीड नियंत्रणासाठी खर्च वाढला. किडीमुळे हा शेतमाल विक्रीसाठी बाजारातही घेऊन जाता येत नसल्याने तो झाडावर आहे, असे वडवळ येथील शेतकरी उबेद पटेल म्हणाले.