लातूरमध्ये पुन्हा भाजप वरचढ;काँग्रेसला आत्मचिंतनाचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:05 PM2019-05-25T18:05:05+5:302019-05-25T18:09:17+5:30

उमेदवार बदलूनही भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना २ लाख ८९ हजार १११ इतके प्रचंड मताधिक्य 

The BJP is again in power in Latur lok sabha election | लातूरमध्ये पुन्हा भाजप वरचढ;काँग्रेसला आत्मचिंतनाचा धडा

लातूरमध्ये पुन्हा भाजप वरचढ;काँग्रेसला आत्मचिंतनाचा धडा

Next
ठळक मुद्देलोकसभा मतदारसंघात भाजपचा सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे हे राजकारणात नवखे होते. 

- हणमंत गायकवाड 

प्रदीर्घ काळ काँग्रेसचे प्राबल्य राहिलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवीत काँग्रेसला आत्मचिंतनाचा धडा दिला आहे. २०१४ मध्ये मोदी लाट आणि २०१९ मध्ये पुन्हा सुप्त लाट असाच प्रत्यय निकालाने समोर आला आहे. भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे हे राजकारणात नवखे होते. 

अलिकडच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात संपर्क वाढविला. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत शृंगारेंनी बाजी मारली आणि प्रचाराच्या प्रारंभापासून मागे वळून पाहिले नाही. निकालामध्ये अपेक्षेप्रमाणे लोहा, अहमदपूर, उदगीर या तीन विधानसभा मतदारसंघांनी भाजपाला आघाडी दिली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा विधानसभा मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष होते. तेथूनही ५५ हजार ९५५ इतके मताधिक्य भाजपाला मिळाले. तर काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाने काँग्रेसला मागे टाकले. तुलनेने भाजपाचे शहर मतदारसंघातील मताधिक्य कमी आहे. तरीही  आ. अमित देशमुख यांची पकड असलेल्या शहर, ग्रामीण या दोन्ही मतदारसंघात भाजपा पुढे राहणे हा काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघात वाढलेल्या मताधिक्यांमुळे भाजपामध्ये जसा उत्साह संचारेल, तशी विधानसभेच्या उमेदवारीसाठी स्पर्धाही होणार आहे. त्यामुळे उन्हाळा संपत आला असला तरी राजकीय धग येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे. 

उमेदवार बदलूनही मताधिक्य कायम 
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आग्रहपूर्वक शृंगारेंचे नाव पुढे आणले. उमेदवार बदलल्याने चर्चा झाली. मात्र ती चर्चा नकारात्मक वळण घेण्याआधीच पालकमंत्र्यांनी शृंगारेंची पहिली प्रचारफेरी पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांच्या सभा घेण्यात भाजप आघाडीवर राहिली. याच्या उलटस्थिती काँग्रेसची राहिली. उमेदवार बदलूनही २ लाख ८९ हजार १११ इतके प्रचंड मताधिक्य भाजपला राहिले. २०१४ मध्ये ५८.२९ टक्के तर २०१९ मध्ये ५६.२२ टक्के असा भाजप मतांचा कौल राहिला आहे.

स्कोअर बोर्ड
नाव     पक्ष     मते      टक्के
सुधाकर शृंगारे    भाजपा     6,61,495    56.22%
मच्छिंद्र कामंत     काँग्रेस     3,72,384    31.65%
राम गारकर     वंचित      1,12,255    9.54%
डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी     बसपा     6,549    0.56%
अरुण सोनटक्के     बरिसोपा     5,208    0.44%
दत्तू करंजीकर     बमुपा     2,194    0.19%
रुपेश शंके     स्वभाप     4,356    0.37%
पपिता रणदिवे     अपक्ष     2,095    0.18%
रमेश कांबळे     अपक्ष     2,116    0.18%
मधुकर कांबळे     अपक्ष     1,326    0.11%
 

Web Title: The BJP is again in power in Latur lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.