मविआविरोधात भाजपचे आंदोलन; प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारून केला निषेध
By आशपाक पठाण | Published: October 21, 2023 04:04 PM2023-10-21T16:04:40+5:302023-10-21T16:04:51+5:30
महाविकास आघाडीने घेतलेला कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय आमच्या सरकारने रद्द केल्याचा आनंद व्यक्त केला.
लातूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय झाला. त्यांच्या काळात झालेले पाप आमच्या सरकारने निर्णय रद्द करून दिलासा दिला. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचा निषेध करून गांधी चौकात भाजपच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात भाजपच्या प्रवक्त्या प्रा. प्रेरणा होनराव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश गोमसाळे, सरचिटणीस ॲड. दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष रागिणीताई यादव, मीनाताई भोसले, गुरूनाथ मगे, प्रविण सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविकास सरकारच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी अशी घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारून आंदोलन केले. यावेळी गजेंद्र बोकन, आकाश बजाज, शितल औसेकर, शितल पाटील, संतोष तिवारी, पंकज शिंदे, किशोर कवडे, विनय जाकते, अरूण जाधव यांच्यासह भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द...
महाविकास आघाडीने घेतलेला कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय आमच्या सरकारने रद्द केल्याचा आनंद व्यक्त करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.