लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाचे वर्चस्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 05:17 PM2020-01-06T17:17:38+5:302020-01-06T17:19:56+5:30
अध्यक्षपदी राहूल केंद्रे, उपाध्यक्षपदी भारतबाई साळूंके यांची बिनविरोध निवड
लातूर : राज्यातील महाविकास आघाडीने काही ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण केल्याने भाजपने सावध भूमिका घेतली होती़ त्यामुळेच लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाचे वर्चस्व कायम राहिले आहे़ अध्यक्षपदी लोहारा गटातील राहूल केंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी अंबुलगा बु़ गटातील भारतबाई दगडू सोळूंके यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली़
लातूर जिल्हा परिषदेत ५८ सदस्य असून, भाजपा ३५, काँग्रेस १४, राष्ट्रवादी ५, शिवसेना व अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे़ भाजपाचे निर्विवाद बर्चस्व आहे़ जिल्हा परिषद अध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते़ पिठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी २ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली होती़ तत्पूर्वी दोन्ही पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता मुदत देण्यात आली होती़ दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहूल केंद्रे तर काँग्रेसकडून पाखरसांगवी गटातील सोनाली थोरमोटे तसेच उपाध्यक्ष पदासाठी भाजपाकडून अंबुलगा बु़ गटातील भारतबाई सोळुंके तर काँग्रेसकडून भादा गटातील धनंजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता़ निवडीसाठीच्या बैठकीवेळी काँग्रेसच्या सोनाली थोरमोटे व धनंजय देशमुख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदी राहूल केंद्रे तर उपाध्यक्षपदी भारतबाई सोळूंके यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकारी पाठक यांनी जाहीर केले़ या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला़
नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी जिल्हा परिषदेतील भाजपाच्या सर्व सदस्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली होती़ या बैठकी वेळी बहुतांश सदस्यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पदाची संधी देऊ नये, असे मत मांडले होते़ त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत अध्यक्षपदासाठी मावळते उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांचे नाव आघाडीवर होते़ मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही मिनिटांपूर्वी अध्यक्षपदासाठी राहूल केंद्रे यांचे नाव जाहीर करण्यात आले़ राहूल केंद्रे व भारतबाई सोळूंके या नव्या चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली आहे़
काँग्रेसचे ३ सदस्य अनुपस्थित़़़
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येवून काही जिल्हा परिषदेतील सत्ता काबीज केल्याच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेतील राजकारणाकडे लक्ष लागले होते़ मात्र विशेष बैठकीस काँग्रेसचे तीन सदस्य अनुपस्थित राहिल्याने बिनविरोध निवड झाली़ त्यातून भाजपाचे वर्चस्व कायम राहिले आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अध्यक्ष केंद्रे, उपाध्यक्ष सोळूंके यांचा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ़ गोविंद केंद्रे, अरविंद पाटील निलंगेकर, आ़ अभिमन्यू पवार, रमेशअप्पा कराड, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, माजी आ़ विनायकराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
१़.४५ वाजता भाजपा सदस्य दाखल
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीवेळी कुठलाही दगा फटका होऊ नये म्हणून जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी काळजी घेत या भाजपा सदस्यांना शनिवारी दुपारीच लातुरातील एका हॉटेलमध्ये एकत्र केले होते़ याशिवाय, हे सदस्य कोणाच्याही रविवारी सायंकाळनंतर त्यांचे मोबाईलही काढून घेण्यात आले होते़ त्यामुळे त्यांच्याशी संपर्कच तुटला होता़ सोमवारी दुपारी २़०० वाजता होणाऱ्या विशेष बैठकीसाठी हे सर्व सदस्य एका खाजगी वाहनातून जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.