अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवाराचा शोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:37 AM2019-09-11T03:37:01+5:302019-09-11T06:34:53+5:30
अगदी प्रारंभापासून भाजपा अथवा शिवसेनेला प्रतिनिधित्व करण्याची संधी या मतदारसंघात आजपर्यंत मिळालेली नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदेतील सत्ता आणि लोकसभेचा निकाल पाहता भाजपाचा जोर वाढला आहे
हणमंत गायकवाड
लातूर : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात जिल्हा बँक आणि बाजार समिती वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपाचा झेंडा फडकला आहे. तरीही माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध भाजपाला घ्यावा लागत आहे.
१९५७ पासून लातूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. केशवराव सोनवणे आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रत्येकी दोन वेळा तर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९६७ मध्ये बापूसाहेब काळदाते तर १९९५ शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा अपवाद वगळता निर्विवाद काँग्रेस राहिली आहे. लातूर विधानसभा मतदारसंघाचे लातूर शहर आणि ग्रामीण असे दोन मतदारसंघ करण्यात आल्यानंतर २००९ पासून विद्यमान आमदार अमित देशमुख या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. आता ते हॅट्ट्रिक करणार का, याकडे लक्ष आहे.
अगदी प्रारंभापासून भाजपा अथवा शिवसेनेला प्रतिनिधित्व करण्याची संधी या मतदारसंघात आजपर्यंत मिळालेली नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदेतील सत्ता आणि लोकसभेचा निकाल पाहता भाजपाचा जोर वाढला आहे. सध्या भाजपाकडून शहर विधानसभा मतदारसंघात २४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असल्या तरी अमित देशमुख यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध भाजपाला अजूनही करावा लागणार आहे.
२०१४ मधील भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यंदाही इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर अन्य इच्छुकांनीही मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मिळविलेली सत्ता, लोकसभेतील उत्तुंग यश यावर भाजपा काँग्रेसचा गड भेदणार की पुन्हा काँग्रेसच आपले वर्चस्व कायम राखणार, याची उत्सुकता मतदारसंघात आहे.
पाच वर्षांत काय घडले?
- काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात प्रथमच लातूर मनपा, जि़प़वर भाजपा सत्तेवर आली़ परिणामी, काँग्रेस या दोन्ही संस्थांत विरोधी बाकावर राहिली़
- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच गोवा राज्याचे प्रभारी म्हणून ठसा उमटविण्यात अमित देशमुख यांना यश़ सत्ता नसतानाही मतदार संघातील विकासकामांवर लक्ष़
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विमानतळाचे विस्तारीकरण, चौपदरी रस्ता, जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी प्रयत्न केले.
- लातूर शहर मतदार संघात सौहार्द व शांतता राखण्यासाठी प्रत्येक समाजघटकाशी संवाद असून, निवडणुकीचा रागरंग पाहून व्यक्तिगत गाठीभेटींवर भर आहे.
गेली पाच वर्षे केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आहे़ त्यांनी आपल्या सत्ताकाळात कोणती ठळक कामे केली, हा प्रश्न आहे़ बेरोजगारी, पाणी अशा मूलभूत समस्यांवर सरकार अपयशी ठरले आहे़ आर्थिक मंदीचे सावट आहे़ बेरोजगारीत वाढ झाली आहे़ याला सरकारच जबाबदार आहे़ - आ़अमित देशमुख, लातूर शहर विधानसभा