ब्लॅक स्पॉट : नांदगावपाटी रास्ता प्रशासनाने केला बंद; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, एकाविरोधात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: March 19, 2025 08:55 IST2025-03-19T08:54:30+5:302025-03-19T08:55:10+5:30
नांदगाव पाटी येथे गत दीड महिन्यात तीन माेठे अपघात झाले. अपघाताचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे...

ब्लॅक स्पॉट : नांदगावपाटी रास्ता प्रशासनाने केला बंद; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, एकाविरोधात गुन्हा दाखल
चाकूर (जि. लातूर) : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पाटी (ता. चाकूर) येथील ‘ब्लॅक स्पाॅट’बाबत प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नांदगाव पाटीकडे जाणारा मार्गच बॅरिकेडसने बंद केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रास्ता राेकाे करत आंदाेलन केले. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात एकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
नांदगाव पाटी येथे गत दीड महिन्यात तीन माेठे अपघात झाले. अपघाताचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नांदगावपाटी येथील हा ब्लॅक स्पाॅट बंद करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी नांदगावपाटी येथे नांदगाव गावाकडे जाणारा रस्ताच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बॅरिकेडस् लावून बंद केला. आता नांदगाव येथून लातूरला जाण्यासाठी वाहनचालकाला मोहदळपाटीपर्यंत यावे लागेल. तेथून पुन्हा वळून लातूरच्या दिशेने त्यांना जावे लागणार आहे. चाकूरकडून नांदगाव, जानवळला जाण्यासाठी टोलनाक्यापासून वळून जानवळ, नांदगावच्या दिशेने आता जावे लागणार आहे. सतत अपघात होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. साेमवारी झालेल्या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, पोनि. बबिता वाकडकर उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी आंदाेलक नागरिकांची समजूत काढली... -
नांदगाव पाटी येथे मंगळवारी सायंकाळी रास्ता राेकाे केला. चौकातून नांदगावकडे जाणारा रस्ता बंद करू नये. यासाठी सचिन साळुंके यांनी वाद घातला. दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे यांनी भेट देत नागरिकांची समजूत काढली.