ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १८ तासानंतर आढळला मृतदेह
By हरी मोकाशे | Published: September 11, 2022 06:52 PM2022-09-11T18:52:17+5:302022-09-11T18:53:27+5:30
ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघापैकी एक तरुण पाण्यात वाहून गेला होता.
निलंगा (जि. लातूर) : ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघापैकी एक तरुण पाण्यात वाहून गेला होता. तब्बल १८ तासानंतर त्याचा मृतदेह तुपडी शिवारात पाण्यावर तरंगत असल्याचे रविवारी आढळून आले.
तालुक्यातील शेडोळ ते तुपडी रस्त्यावरील पुलावरुन शनिवारी दुपारी ३ वा. पाणी वाहत होते. दरम्यान, दुचाकीवरुन तीन युवक लातूरकडे निघाले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकीसह वाहून गेले. सुदैवाने त्यातील दोघे बचावले. शेडोळ येथील गहिनीनाथ जाधव (३०) हा वाहून गेला. दरम्यान, त्याचा शोध एनडीआरएफच्या पथकाने घेतला. त्यात दुचाकी सापडली. परंतु, सदरील तरुण सापडला नाही.
शनिवारी राञी उशीरापर्यंत तरूणाचा शोध सुरु होता. रविवारी सकाळी ८ वा. तालुक्यातील तुपडी परिसरातील पाण्यावर जाधव याचे प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पानचिंचोली पोलीस चौकीत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पानचिंचोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत जाधव यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.