बहुजन रयत परिषदेचे बोंब मारो आंदोलन; आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर संताप
By हरी मोकाशे | Published: October 4, 2023 07:35 PM2023-10-04T19:35:32+5:302023-10-04T19:35:54+5:30
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवर कडक कारवाई करण्यात यावी
लातूर : नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्रधारकांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप करत बहुजन रयत परिषदेतर्फे बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयासमाेर धरणे धरण्याबरोबरच बोंब मारो आंदाेलन करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. त्याची तपासणी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी. नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून सन २०१७ ते २०२२ या कालावधीत देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात यावी, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवर कडक कारवाई करण्यात यावी, दफ्तर दिरंगाई करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बहुजन रयत परिषदेतर्फे धरणे आंदोलनाबरोबरच बोंब मारो आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यात काेमलताई साळुंके, अमित तांबे, बंडू पवार, गणेश गायकवाड, राहुल पाटोळे, नाना कसबे, प्रवीण नरसिंगे, सुंदर एडके, संजय महापुरे, त्रिंबक सूर्यवंशी, कमलाकर अनंतवाड, योगेश येडोळे, संजय चव्हाण, आम्रपाली माने, मनीषा देडे, शकुंतला शिंदे, अनुराधा कांबळे, संगीता कठारे, भारत उदारे, संगीता एडके, रेश्मा शिंदे, तानाजी कांबळे, दत्तात्रय एडके आदी सहभागी झाले होते.