विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडून लाच; १५ हजार घेताना ग्राम रोजगारसेवक एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:16 IST2025-02-19T12:15:23+5:302025-02-19T12:16:01+5:30
ग्रामपंचायत कार्यालयातच एसीबीची कारवाई

विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडून लाच; १५ हजार घेताना ग्राम रोजगारसेवक एसीबीच्या जाळ्यात
लातूर : आई आणि चुलतीच्या नावे विहीर मंजूर व्हावी, यासाठी प्रस्ताव दाखल केला हाेता. या कामासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणारा ग्राम राेजगारसेवक अरुण ज्ञानोबा सुरवसे (वय ५१) याला शिराळा (ता. जि. लातूर) ग्रामपंचायत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, तक्रारदार तरुणाने आपल्या आई आणि चुलतीच्या नावे विहीर मिळावी म्हणून प्रस्ताव दाखल केला हाेता. दरम्यान, या कामासाठी शिराळा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेला ग्राम राेजगारसेवक अरुण सुरवसे याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती. याबाबत लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३० वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी शिराळा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातच सापळा लावला. पंचासमक्ष १५ हजारांची लाच घेताना ग्रामराेजगार सेवक अरुण सुरवसे याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.