तोळाभर अंगठीसाठी विवाहितेचा छळ करुन खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 06:01 PM2019-07-29T18:01:40+5:302019-07-29T18:04:15+5:30
अंगठीसाठी पती व सासू तगादा लावून चार- चार दिवस उपाशी ठेवून मारहाण करीत
रेणापूर (जि़ लातूर) : विवाहात बोललेल्या तोळाभर सोन्याच्या अंगठीसाठी पती व सासूने २० वर्षीय विवाहितेस छळ करुन मारहाण केली़ तसेच खून केल्याची घटना तालुक्यातील दर्जी बोरगाव येथे घडली़ याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पूजा लक्ष्मण हारके (२०, रा़ दर्जी बोरगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे़ पोलिसांनी सांगितले की, पूजा काशिनाथ डांगे ही एक वर्षाची असताना तिला पुष्पा कमलाकर काडोदे (रा. तावरजा कॉलनी, लातूर) यांनी २० वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते़ तिचा दोन वर्षांपूर्वी दर्जी बोरगाव (ता़ रेणापूर) येथील लक्ष्मण सूर्यकांत हारके याच्याशी रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला़ दरम्यान, सासरच्यांनी एक तोळ्याची सोन्याची अंगठी मागितली़ तेव्हा पूजाच्या आईने काही दिवसांनी देते असे सांगितले़
दरम्यान, सोन्याच्या अंगठीसाठी पती व सासू तगादा लावून चार- चार दिवस उपाशी ठेवून मारहाण करीत असल्याचे पूजाने आईस सांगितले़ तेव्हा तिची समजूत काढून तिला पाठविण्यात येत असे़ अंगठी आणत नसल्याचे पाहून पती व सासूने पूजाला माहेरी पाठविण्यास वर्षभरापासून बंद केले होते़ १५ दिवसांपूर्वी पुजाची आई तिला भेटण्यासाठी दर्जी बोरगाव येथे गेली असता सोन्याची अंगठी देत नसाल तर येथे याचचे नाही़ अन्यथा पाय मोडू अशी धमकी पूजाचा पती व सासूने दिली़
रविवारी सोन्याच्या अंगठीच्या कारणावरुन पती लक्ष्मण व सासूने पूजाचा शारीरिक, मानसिक छळ करून उपाशीपोटी ठेवले़ तसेच वारंवार मारहाण करुन जखमी केले़ शरीरावर व डोक्यात गंभीर जखमी झाल्याने पूजा हारके हिचा मृत्यू झाला आहे, अशी फिर्याद विवाहितेची आई पुष्पा काडोदे यांनी दिल्याने रेणापूर पोलीस ठाण्यात दिल्याने रविवारी रात्री उशिरा मयत विवाहितेचा पती लक्ष्मण हारके व सासू महानंदा हारके यांच्याविरुध्द कलम ३०४ ब, ३०२, ३४ भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी
रेणापूर पोलिसांनी आरोपी लक्ष्मण हारके व महानंदा हारके यांना अटक करुन सोमवारी रेणापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपींना १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ अधिक तपास पोलीस निरीक्षक गोरख दिवे करीत आहेत़