गुन्हेगारांना दणका; सात जण तडीपार!
By राजकुमार जोंधळे | Published: April 3, 2024 08:38 PM2024-04-03T20:38:33+5:302024-04-03T20:39:02+5:30
पोलिसांची कारवाई : ७०० जणांविरोधात आवळला कायद्याचा फास
लातूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पाेलिसांनी राबविलेल्या काेम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दाेन सराईत गुंडांच्या टाेळ्यातील सहाजणांसह इतर रेकाॅर्डवरील सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करत त्यांच्याविराेधात कायद्याचा फास आवळला आहे. यातून गुन्हेगारांना निवडणुकीच्या ताेंडावर पाेलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.
गत दाेन आठवड्यांत राबविण्यात आलेल्या काेम्बिंग ऑपरेशनमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. शिवाय, विविध कलमान्वये स्वतंत्र ७०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धाडसत्रात तब्बल सव्वा काेटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. काेम्बिंग ऑपरेशन, रूटमार्च, गावभेटी, मतदान केंद्राची पाहणी, गुन्हेगार आणि सार्वजिनक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांविराेधात प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्चअखेर ३१४ व्यक्तीविराेधात १२० जुगाराचे गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देशी-विदेशी दारू, हातभट्टीची वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्यांविराेधात ५७५ जणांविरुद्ध ५६७ गुन्हे दाखल केले आहेत. यातून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रेकाॅर्डवरील फरार पाच आराेपींना अटक...
लातूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या काेम्बिंग ऑपरेशनमध्ये फरार झालेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर रेकाॅर्डवरील अनेक गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नाेटिशी बजावण्यात आलेल्या आहेत.
सर्वाधिक कारवाया लातुरातील ठाण्यात...
लातूर जिल्ह्यातील २३ पाेलिस ठाण्याकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविराेधात कारवाईचा धडका सुरू केला आहे. लातुरातील पाेलिस ठाण्यांनी सर्वाधिक कारवाई केली असून, त्यापाठाेपाठ उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा ठाण्यांनी केली आहे. सहा उपविभागाअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई माेहीम हाती घेण्यात आली आहे.
एमपीडीए कायद्यानुसार सात जणांविराेधात कारवाई...
महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यानुसार आतापर्यंत सात जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. शिवाय, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांवर पाेलिस कारवाई करत आहेत. सार्वजिनक शांतता भंग करणाऱ्या, वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
- साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक