बस-दुचाकी अपघात; एक जण जागीच ठार, चलबुर्गा पाटी येथे रात्री उशिरा घडली घटना
By राजकुमार जोंधळे | Published: January 20, 2024 12:21 PM2024-01-20T12:21:53+5:302024-01-20T12:22:43+5:30
मयत शाम गिरी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार
राजकुमार जाेंधळे / निलंगा (जि. लातूर) : बस-दुचाकी अपघातात एक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा लातूर-बीदर महामार्गावरील चलबुर्गा पाटी येथे घडली. पाेलिसांनी सांगितले, शाम अंगद गिरी (वय ४०, रा. शिरसल, ता. औसा) हे लातूर येथील आपले कामकाज आटोपून गावाकडे दुचाकीवरून निघाले हाेते. दरम्यान, निलंगा येथून निलंगा-नांदेड ही बस लातूरमार्गे निघाली होती. चलबुर्गा पाटी येथे आल्यानंतर रात्री बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यात शाम अंगद गिरी हे जागीच ठार झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. शाम गिरी यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. त्यांच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी १० वाजता शिरसल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
घटनास्थळी औशाचे आगरप्रमुख अजय गायकवाड यांनी भेट दिली. निलंगा आगाराचे बसचालक विजय सूर्यवंशी यांनी किल्लारी पोलिस ठाण्यात धाव घेतली असून, याबाबत किल्लारी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत शाम गिरी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.