बसचालकास टवाळखोरांची मारहाण; गौर, आनंदवाडी ग्रामस्थांकडून निषेध
By संदीप शिंदे | Published: September 19, 2023 06:37 PM2023-09-19T18:37:26+5:302023-09-19T18:38:10+5:30
मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
निलंगा : आगाराच्या एका बस चालकास राठोड गावात काही जणांनी जबर मारहाण केल्याने बसचालक गंभीर जखमी झाला असून, अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ गौर व आनंदवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी निषेध नोंदविला. तसेच संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली.
सोमवारी सकाळी राठोडामार्गे बसचालक पुंडलिक कवठेकर हे निलंग्याकडे बस घेऊन जात असताना राठोडा या गावांमध्ये प्रवासी घेण्यासाठी बस थांबली असता येथील काही तरुणांनी बसचालक कवठेकर यांना मारहाण केली. या मारहाणीत चालक कवठेकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना निलंगा उपजिल्हा रुग्णालयातून लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेचा गौर आणि आनंदवाडी ग्रामस्थांनी निषेध नोंदवून संबधितांवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी विठ्ठल टोकले, विष्णू पाटील, ज्ञानोबा चामे, बबन चव्हाण, विठ्ठल देशमुख, बाबू सावळे, प्रकाश तावडे, विक्रम बोरोळे, विष्णू जाबळदरे, बाबूस तावडे, तुळशीराम जांभळेदरे, सुनील देशमुख, बबन काळे, ज्ञानोबा टोकले, सिद्धेश्वर तावडे, निलेश तावडे, पांडुरंग पाटील, शहाजी शेंद्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
बसचालकास झालेली मारहाण निंदनीय...
राठोड येथे बसचालकास झालेली मारहाण ही एक निंदनीय असून बसच्या संदर्भात काही अडचणी असतील तर आमच्याशी बोलावे. निवेदन देऊन रीतसर तक्रार करावी. परंतू चालकास कोणताही गुन्हा नसताना मारहाण करणे चुकीचे आहे.- अनिल बिडवे, आगारप्रमुख, निलंगा