लातूरमधील औसा येथे बस-ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 03:56 PM2017-11-18T15:56:18+5:302017-11-18T18:55:58+5:30

लातूरमधील औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे.

Bus-truck accident in Ausa (Latur), 10 dead | लातूरमधील औसा येथे बस-ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू

लातूरमधील औसा येथे बस-ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

लातूर :  लातूर-निलंगा बस व एका ट्रकची औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक झाली. यामध्ये 8 जण ठार झाले असून 23 जण गंभीर स्वरुपात जखमी झालेत. लातूरच्या शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे.  हा अपघात इतका भयंकर होता की, बसच्या उजव्या बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला. लातूर येथून दुपारी निघालेली बस (क्र. एमएच २० डी ९६११) ही दुपारी 3 वाजता चलबुर्गा पाटीजवळ पोहोचली. दरम्यान, लामजना मार्गे लातूरकडे निघालेला ट्रक (क्र. एमएच १३ एएक्स ४८३१) आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात 6 जण जागेवरच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचाराला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तसेच गंभीर जखमी झालेल्या 23 जणांना तातडीने लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. अपघातातील 8 मृतांपैकी चार जणांची ओळख पटली आहे. त्यामध्ये जगन्नाथ विश्वनाथ येणकुरे (वय ७०, रा. चौकीवाडी, ता. बस्वकल्याण, कर्नाटक), मंगलबाई श्रीमंतराव शिंदे (वय ६०, रा. गुणेवाडी), श्रुती मारोती पाटील (रा. गुणेवाडी), बाबुराव विश्वंभर माने (५५, रा. रामतीर्थ ता. निलंगा) अशी मृतांची नावं आहेत. 

तसेच उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमींमध्ये एसटी चालक एन.बी. साबणे, वाहन चालक डी.एन. बिराजदार व प्रवासी नरेश भगवानराव (वय ८५), कांता भानुदास बस्तापुरे (५०), गोदावरी विश्वनाथ, मारोती शंकर, तुळजाबाई धोंडिराम काळे (६५), विठ्ठल गोविंद कांबळे (६३), तानूबाई विठ्ठल कांबळे (५८), शिवाजी ज्योतिबा पांचाळ, बब्रुवान प्रभू भोसले (७०), मोतीराम बळीराम सूर्यवंशी (४०), सय्यद अब्दुल गणी महेबुब (६२), प्रेमदास अण्णाराव आडे (१०), अण्णाराव मारोती आडे (३५), शेख रब्बानी जमीर (४९), नागनाथ कापसे (६०, औराद शहाजानी), संतराम कोंडिबा वाघमारे (५५), फुलाबाई संतराम वाघमारे (४५), कोमल गुलाब आडे (८) आणि रायबू पठारे, ओमकार मारोती पाटील आणि आशा मारोती पाटील (रा. गुणेवाडी) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. 

जखमींच्या मदतीसाठी पोलिसांसह ग्रामस्थ सरसावले
दुपारच्या सुमारास जोरदार धडकेमुळे मोठा आवाज झाला. २३ जण गंभीर जखमी असल्याने मदतीसाठी टाहो फोडणा-या हाका ऐकू येत होत्या. त्यावेळी रस्त्याने जाणा-या वाहनांतील लोकांनी परिसरातील शेतात असणा-या ग्रामस्थांनी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. चार रुग्णवाहिका व दोन जीपमध्ये जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. सर्वप्रथम पोलीस उपाधीक्षक गणेश किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन भोसले व पोलीस फौजफाटा पोहोचला. तद्नंतर लातूर येथून अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनीही घटनास्थळ गाठले. एस.टी. महामंडळ व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. 

पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेट
कामगार कल्याण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एस.टी. महामंडळाचे मच्छिंद्र काळे यांनी जखमींना रुग्णालयात हलविल्याची माहिती दिली.

कार रस्त्याच्या खाली
बस व ट्रकच्या अपघातादरम्यान बसच्या पाठीमागून येत असलेल्या कार (क्र. एमएच २४ एएफ १३९५) मधील लोक बालंबाल बचावले. प्रसंगावधान राखून कार रस्त्याच्या खाली नेली, असे प्रिया विरपक्ष सैदापुरे यांनी सांगितले. 

खड्डा, जम्पिंग रोडचे बळी
राज्यात खड्डेमुक्तीची मोहीम सुरू असली, तरी मराठवाडा खड्डे बुजविण्यात सर्वात मागे आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील राज्य महामार्गांची दयनीय अवस्था असून, काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या अपघातस्थळी एक-दोन लहान खड्डे आहेत. ते चुकविताना अपघात झाला, असे काहींचे म्हणणे आहे. त्यापेक्षाही अधिक गंभीर म्हणजे लामजना ते औसा दरम्यानचा रस्ता जम्पिंग आहे. त्यामुळे या मार्गावर लहान-मोठे अपघात सततचे आहेत.

 

 

Web Title: Bus-truck accident in Ausa (Latur), 10 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.