आरक्षण आंदोलन! धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू; दोन दिवसानंतर प्रवाशांनाही दिलासा
By आशपाक पठाण | Published: February 18, 2024 05:03 PM2024-02-18T17:03:12+5:302024-02-18T17:03:23+5:30
रविवारी धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
लातूर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या मागील तीन दिवसांपासून बंद आहेत. रविवारी धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. दोन जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम असल्याने खबरदारी म्हणून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. लातूर आगारातून शुक्रवार, शनिवार व रविवारीही अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.
शनिवारी पहाटे ४ वाजेपासूनच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या, तसेच लांब पल्ल्याच्या सर्व बसेस थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे शनिवारी ६०३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. जिल्हांतर्गत निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, शिरूर अनंतपाळसह ग्रामीण भागातील बसेस सुरू होत्या. रविवारी सकाळी धाराशिव आणि नांदेड मार्ग वगळता इतर मार्गावरील सर्व बसेस सोडण्यात आल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपाेषणाला बसल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे काढली जात आहेत. त्यामुळे शुक्रवार, शनिवार दोन दिवस लातूर आगारातून लांब पल्ल्याच्या सर्व बसेस डेपोतच थांबविण्यात आल्या होत्या. रविवारी बसेस सुरू झाल्यामुळे प्रवाशांचीही सोय झाली आहे.
तिसऱ्या दिवशी बससेवा सुरळीत...
मराठा आरक्षणाच्या धास्तीने लातूर विभागातून राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या सर्व बसेस दोन दिवस डेपोतच थांबविण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, साेलापूर, बीड, परभणी आदी मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या दिवशी बहुतांश मार्गावरील बससेवा सुरू केली आहे. केवळ धाराशिव आणि नांदेड मार्गावरील बसेस रविवारीही थांबविण्यात आल्या. - संदीप पडवळ, जिल्हा वाहतूक अधिकारी, एस.टी. महामंडळ.