प्लाॅटचे ठरावपत्र तयार करून एकाला २५ लाखांना गंडविले !
By राजकुमार जोंधळे | Published: April 23, 2023 09:12 PM2023-04-23T21:12:58+5:302023-04-23T21:13:04+5:30
देवणी येथील घटना : तिघांवर फसवणुकीचा गुन्हा...
लातूर : प्लाॅटचे ठरावपत्र करून, एनए झाल्यानंतर खरेदीखत करून देताे म्हणून एकाला तिघांनी २५ लाख रुपयांना गंडविल्याची घटना देवणी येथे घडली. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी यशवंत शंकरराव पाटील (वय ५९, रा. देवणी) यांना संताेष सुधाकरराव कारभारी, साेमनाथ मलशेट्टी सावळे (दाेघेही रा. दवण हिप्परगा, ता. देवणी) आणि चंद्रकांत रामराव कदम (रा. देवणी) यांनी संगनमत करून फिर्यादीस प्लाॅट देण्याच्या कारणावरून २५ लाख रुपये घेत ठरावपत्र करून घेतले. एनए झाल्यानंतर खरेदीखत करून देताे म्हणून, खरेदीखत करून न देता दुसऱ्यालाच बेकायदेशीररीत्या विक्री केली. यातून फिर्यादीच्या नावे एक नवीन ठरावपत्राचा खाेटा बाॅण्ड तयार करून, फिर्यादीची स्वाक्षरी करून नाेटरी रद्दपत्र तयार करून, बनावट कागदपत्र तयार करून फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. हा गुन्हा १७ जानेवारी २०२२ ते ११ एप्रिल २०२३ या काळात घडला आहे.
याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुरनं. १०८ / २०२३ कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड काॅन्स्टेबल कांबळे करत आहेत.