लातुरात 'केबल वॉर'चा भडका; बंदमध्ये सहभागी न झाल्याने हॅथवे एमसीएनचे कंट्रोल रुम पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 05:49 PM2019-02-14T17:49:30+5:302019-02-14T17:54:34+5:30
एका गटाने केबल चालू ठेवले. त्याच वादातून हॅथवे एमसीएनच्या कंट्रोल रुमवर पेट्रोल टाकून यंत्रसामुग्री जाळल्याचे सांगण्यात येते.
लातूर : औसा रोडवरील हॅथवे एमसीएनच्या कंट्रोल रुमवर अज्ञात दोघा तरुणांनी पेट्रोल टाकून आग लावली. यात भडका होऊन कंट्रोल रुममधील केबल तसेच सेटअप बॉक्स व काही यंत्रसामुग्री जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ‘केबल वॉर’मधून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
लातूर शहरातील औसा रोडवर पारिजात मंगल कार्यालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर आयसीआयसीआय बँकेची शाखा असून, वरील मजल्यावर इन्शुरन्स कार्यालय आहे. त्याच्याच बाजूला हॅथवे एमसीएनचे कार्यालय व कंट्रोल रुम आहे. मागच्या दोन दिवसांपासून ट्राय निर्णयाच्या विरोधात केबल आॅपरेटरनी बंद पुकारला आहे. परंतु, यात एका गटाने केबल चालू ठेवले. त्याच वादातून हॅथवे एमसीएनच्या कंट्रोल रुमवर पेट्रोल टाकून यंत्रसामुग्री जाळल्याचे सांगण्यात येते. जिल्हाभरात एमसीएनचे ७० आॅपरेटर्स आहेत. यापैकी बहुतांश जणांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला.
मात्र एका गटाने बंद झुगारून केबल सुरू ठेवले. त्याचे केबल कनेक्शन तोडल्यामुळे वादाची ठिणगी पडली आणि प्रकरण कंट्रोल रुम जाळण्यापर्यंत गेले, असे सांगण्यात येते. या घटनेत कंट्रोल रुममधील जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पेट्रोलच्या भडक्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. औसा रोड परिसरात या घटनेमुळे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. तात्काळ अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, एमसीएनचे स्थानिक व्यवस्थापक दीपरत्न निलंगेकर यांनी शिवाजीनगर पोलिसात या संदर्भात फिर्याद दिली असून, पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. कंट्रोल रुम सध्या पोलिसांनी सील केले आहे. सायंकाळपर्यंत गुन्ह्याची नोंद होईल, असे पोलीससूत्रांकडून सांगण्यात आले.