मराठा समाजाकरिता विशेष अधिवेशन बोलवा; आमदारांचे मंत्रालयासमोर लाक्षणिक उपोषण
By संदीप शिंदे | Published: October 31, 2023 02:09 PM2023-10-31T14:09:16+5:302023-10-31T14:09:56+5:30
आमदारांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण
लातूर : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावे, मराठा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अहमदपूर मतदारसंघाचे आ. बाबासाहेब पाटील यांनी मुंबई मंत्रालय समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. समवेत आ. निलेश लंके, आ. कैलास पाटील घाडगे, आ. राजू नवघरे, आ. राहुल पाटील, मोहन हंबरडे यांचा समावेश आहे
मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे राज्यभर आरक्षणाचा लढा तीव्र झाला आहे.विविध ठिकाणी साखळी, आमरण उपोषण करण्यात येत आहेत. दरम्यान, काही मराठा आमदार, खासदारांनी आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे. तर अनेक आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, आज सकाळी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अहमदपूर मतदारसंघाचे आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह काही आमदारांनी लाक्षणिक उपोषण केले. यात आमदार बाळासाहेब पाटील, आ. निलेश लंके, आ. कैलास पाटील घाडगे, आ. राजू नवघरे, आ. राहुल पाटील, मोहन हंबरडे यांचा समावेश आहे. राज्य सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे व समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली.
दरम्यान, आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आमदार, खासदार यांना आम्ही राजीनामा देण्यास सांगितले नाही. त्यांनी राजीनामा देऊ नये. सर्व आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्र्यांनी मुंबई गाठावी. राज्य सरकारला विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करावी. तसेच तत्काळ आरक्षण देण्यासाठी सरकारच्या मागे लागावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी कोणीतरी असावे, नसता तुम्ही रिकामे, आम्ही रिकामे अशी परिस्थिति होईल, असेही जरांगे म्हणाले.