मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट
By हरी मोकाशे | Published: September 7, 2022 01:54 PM2022-09-07T13:54:02+5:302022-09-07T13:55:41+5:30
मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागत आहे. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजही करावे लागत आहे.
लातूर : सध्या मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम सुरु आहे. त्यासाठी शिक्षकांना दैनंदिन कामकाजातून पूर्णवेळ सूट देण्यात यावी, अशी मागणी औसा तालुका शिक्षक संघटनेच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली होती. त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे १३ सप्टेंबरपर्यंत ऑनड्युटी मतदान ओळखपत्रास आधारकार्ड लिंक करण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागत आहे. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजही करावे लागत आहे. त्यामुळे बीएलओंना दैनंदिन कामकाजातून पूर्णवेळ सूट देण्यात यावी, अशी मागणी औसा तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी सूचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेऊन १३ सप्टेंबरपर्यंत ऑनड्यूटी मतदान ओळखपत्रास आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
या कामी नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर, सुरेश पाटील, महसूल सहाय्यक शरद मोरे, भीमाशंकर वाडेकर, एस.डी. सूर्यवंशी आदींचे सहकार्य लाभले. यावेळी तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार, दीपक चामे, गोविंद जगताप, मोहन सावंत, डी.झेड. गायकवाड, दयानंद वायदंडे, आर.डी. जाधव आदी उपस्थित होते. या निर्णयामुळे सुरेश सुडे, प्रदीप ढेंकरे, संजय बिरादार, अमोल राठोड, चंद्रकांत तोळमारे, अतुल क्षीरसागर, जगन्नाथ पांढरे, शिवाजी चौहाण यांच्यासह बीएलओंनी समाधान व्यक्त केले.
२५४ बीएलओंना लाभ...
बहुतांश बीएलओ शिक्षकांकडे १३०० पेक्षा जास्त मतदार आहेत. तसेच काही शिक्षकांकडे ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे दोन-तीन अशी गावे आहेत. एक बीएलओ दररोज अधिकाधिक ६० नोंदणी करू शकतो. त्यामुळे हे काम विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी ही ऑनड्युटी आवश्यक होती. त्याचा औसा तालुक्यातील २५४ बीएलओंना लाभ मिळणार आहे.
- दयानंद बिराजदार, तालुकाध्यक्ष, शिक्षक काँग्रेस.