कॅन्सरवर उपचाराचा दावा, भूत, भानामतीची भीती दाखवून गंडविणारा भोंदू गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 08:10 AM2022-03-12T08:10:59+5:302022-03-12T08:15:02+5:30

अंनिस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने भोंदूचा भांडाफोड केला

Cancer treatment claim, ghost threat, fake baba arrested in Latur District | कॅन्सरवर उपचाराचा दावा, भूत, भानामतीची भीती दाखवून गंडविणारा भोंदू गजाआड

कॅन्सरवर उपचाराचा दावा, भूत, भानामतीची भीती दाखवून गंडविणारा भोंदू गजाआड

googlenewsNext

किनगाव : भूत, करणी, भानामतीची अंधश्रद्धा पसरवित, ती उतरविण्याचा दावा करत अनेकांना गंडविणाऱ्या भोंदूला किनगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा गजाआड केले. विशेष म्हणजे भोंदूने कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, मणक्याचे आजार दूर करण्याच्या बहाण्याने अनेकांना नादाला लावले होते. अखेर अंनिस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने भोंदूचा भांडाफोड केला.

पोलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथील बाबा हकानी इस्माईल शेख आपल्या घरी दर गुरुवारी अमावास्या, पौर्णिमेला दरबार भरवत होता. मूल होत नसेल, धंद्यात बरकत, घरात शांती नसेल, घरातील तंटे यावरही इलाज सांगत असे. दरम्यान, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भोंदूगिरीची खात्री करून जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना माहिती दिली. उपाधीक्षक बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक चिदंबर कामठेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, उपनिरीक्षक राजेश जाधव, मुरलीधर मुरकुटे, शिवाजी तोपरपे चमूने धाड टाकून हकानी बाबाला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध अमानूष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियमच्या कलम ३ (२) व ४२० नुसार गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र अंनिसचे माधव बावगे, रुक्साना सय्यद, रणजीत आचार्य, सुधीर भोसले, हनुमंत मुंडे, दगडूसाहेब पडिले यांनी प्रत्यक्ष पाठपुरावा करून भांडाफोड केला.

लिंबू डोळ्यात पिळणे...
कोंबड्या उतरविणे, भक्ताच्या ऐपतीप्रमाणे कंदुरी, दानपेटीत दान, बाबाच्या फोटोपुढे किमान पन्नास, शंभर, पाचशेच्या नोटा टाकायला सांगायचा. उपचार म्हणून लिंबू कापून नाका डोळ्यात पिळणे, उपचाराला आलेल्यांच्या अंगाला स्पर्श करून लिंबू चोळणे, कोंबडीची मान मोडून भक्तांच्या अंगावरून उतरवणे, असे उपचार करायचा. या भोंदूचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे सहकार्य मिळाले. सामान्य लोकांची फसवणूक थांबली. 
- माधव बावगे, राज्य प्रधान सचिव, अंनिस

Web Title: Cancer treatment claim, ghost threat, fake baba arrested in Latur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.