उदगीरच्या मतदारांचा कौल मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 08:28 PM2019-04-13T20:28:02+5:302019-04-13T20:34:20+5:30

उमेदवारांनी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रचार यंत्रणा उभी केली आहे.

Candidates' struggle for getting votes from Udgir voters | उदगीरच्या मतदारांचा कौल मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड 

उदगीरच्या मतदारांचा कौल मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड 

Next

उदगीर / जळकोट : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मागील लोकसभा, विधानसभा, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व असून, भाजपने मारलेली मुसंडी रोखण्यासाठी काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. जळकोट तालुक्यातही काँग्रेस, भाजपात तुल्यबळ लढत होईल, असे चित्र आहे. काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत हे स्थानिक असल्याने त्यांच्याविषयी सहानुभूती असल्याचेही दिसून येत आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा त्यानंतर नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पार्टीने मताधिक्य घेत विविध संस्था ताब्यात घेतल्या. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला पाच दिवस असताना अजून एकही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या सभेचे नियोजन सुरू आहे. उदगीर पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेची सत्ता भाजपला दिल्यास उदगीर शहराला लिंबोटीचे पाणी देण्याचे अभिवचन दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अभिवचनाला इथल्या स्थानिक नेत्यांनी हरताळ फासला आहे. महिन्यातून एक किंवा दोन वेळा पाणी पुरवठा होतो. लिंबोटीची योजना वादात अडकून पडलेली असताना शहरात पाईप लाईन टाकून रस्ते उखडून टाकण्याचे काम केले जात आहे. याशिवाय भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने सारी फोल ठरली असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मतदारांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मात्र भाजपातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रचार यंत्रणा उभी केली आहे.

जळकोट तालुक्यातील काही गावे पीकविम्यातून वगळण्यात आल्याने शेतकरी सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आहेत. आ. सुधाकर भालेराव यांनीही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रचार मोहीम सुुरु केली आहे. यावेळी मतदार कोणाच्या पारड्यात वजन टाकतात हे निकालानंतर स्पष्ट होईल़ 

Web Title: Candidates' struggle for getting votes from Udgir voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.