शेतात पत्र्याच्या शेडमागे आढळली गांजाची झाडे; शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 05:54 PM2022-02-22T17:54:50+5:302022-02-22T17:55:30+5:30
पत्र्याच्या शेडच्या पाठिमागील माेकळ्या जागेत ३० गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले.
लातूर : औसा तालुक्यातील खुंटेगाव शिवारात एका शेतकऱ्यांने पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. याबाबत पाेलिसांनी घटनास्थळी भेट देत जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात एका शेतकऱ्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील खुंटेगाव येथील शेतकरी विठ्ठल अप्पाराव पांढरे (७०) यांची गट नंबर ३३३ मध्ये शेती आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या शेतात असलेल्या शेडच्या पाठीमागे गांजाची झाडे लावली असल्याची माहिती औसा येथील पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी मंगळवारी छापा मारला. यावेळी पत्र्याच्या शेडच्या पाठिमागील माेकळ्या जागेत ३० गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, एकूण २१ किलाे ७०० ग्रॅम वजनाचा हिरवा पाला असा एकूण १ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पाेलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औसा पाेलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यांविराेधात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनाेव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, अधिनियम सन १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.