कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार, तर एक गंभीर; लातूर-लामजना महामार्गावरील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: July 6, 2024 12:27 AM2024-07-06T00:27:55+5:302024-07-06T00:27:55+5:30
किल्लारी (जि. लातूर) : भरधाव कार आणि दुचाकीचा समाेरासमाेर भीषण अपघात होऊन, एक जागीच ठार झाला, तर एक ...
किल्लारी (जि. लातूर) : भरधाव कार आणि दुचाकीचा समाेरासमाेर भीषण अपघात होऊन, एक जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात लामजना-लातूर महामार्गावर रात्री ८:४० वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, लामजना येथून दुचाकीवरून (एम. एच. २५ डब्ल्यू २०७६) आरोग्य विभागातील कर्मचारी महमद करीम पठाण (वय ५१, रा. दाउतपूर, ता. जि. धारशीव) आणि तालुका आरोग्य अधिकारी नंदकुमार सदाशिव नेहरकर (वय ४०, रा. उमरगा) हे लातूरकडे निघाले हाेते. दरम्यान, लातूरकडून येणाऱ्या भरधाव आल्टाे कंपनीच्या कारचा (एम.एच. २४ व्ही. ७१९) समाेरासमाेर भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री ८:४० वाजण्याच्या सुमारास लामजना पाटी येथील टाेल नाक्यानजीक झाला. यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी मोहम्मद करीम पठाण हे जागीच ठार झाले, तर तालुका आराेग्य अधिकारी नंदकुमार सदाशिव नेहरकर यांच्या दाेन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
घटनास्थळी किल्लारी पाेलिस ठाण्याचे सपोनि केदार, मुरली दंतराव, पाेउपनि. ढोणे, दिगंबर शिंदे, धनू कांबळे, कृष्णा गायकवाड यांनी भेट दिली. याबाबत किल्लारी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.