विवाहितेच्या खूनप्रकरणी सासरच्या ५ जणांवर गुन्हा; पती, सासऱ्यास अटक : संशय घेत केला छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 10:52 PM2023-09-24T22:52:17+5:302023-09-24T22:52:45+5:30
सहा महिन्यांनंतर पुन्हा ती सासरी आली होती. संशयातून पती, भाया, जाऊ, सासू, सासऱ्यानी संगनमत करून विवाहितेला शनिवार, २३ सप्टेंबर राेजी रात्री ठार मारले.
किनगाव (जि. लातूर) : लग्नानंतर सासरच्या मंडळींनी छळ करून, संशय घेत राजेवाडी (ता. चाकूर) येथील विवाहितेचा खून केल्याप्रकरणी किनगाव पाेलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, किनगाव ठाण्यात अंगद गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, कासारवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील स्वातीचा विवाह राजेवाडी येथील गोविंद केदार याच्यासाेबत २००९ मध्ये झाला हाेता. दरम्यान, त्यांना पहिली मुलगी (वय ९), दुसरी मुलगी (६) आणि एक मुलगा (२) असे तीन अपत्य आहेत. लग्नापासून विवाहिता स्वाती गोविंद केदार (वय ३३) हिचा सासरच्या मंडळींनी छळ करून सातत्याने संशय घेतला. याला वैतागून ती काही दिवस माहेरी गेली होती. सहा महिन्यांनंतर पुन्हा ती सासरी आली होती. संशयातून पती, भाया, जाऊ, सासू, सासऱ्यानी संगनमत करून विवाहितेला शनिवार, २३ सप्टेंबर राेजी रात्री ठार मारले.
याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात अंगद बाबुराव गुट्टे (रा. कासारवाडी, ता. परळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती गोविंद केदार, विष्णू केदार, सुमन केदार, जगन्नाथ केदार, कमलाबाई केदार (सर्व रा. राजेवडी) यांच्याविरुद्ध गुरनं. २३६ / २०२३ कलम ३०२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी पती, सासऱ्याला अटक केली आहे. तपास पोउपनि. तोटेवाड करत आहेत.