ट्रॅप नव्हे एसीबीने केली उघड चाैकशी; बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तलाठ्यासह तिघांवर गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: January 20, 2023 07:47 PM2023-01-20T19:47:32+5:302023-01-20T19:47:55+5:30
तलाठी आणि कुटुंबातील दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
लातूर : उदगीर तालुक्यातील बाेरगाव (बु.), काेदळी येथे कार्यरत तलाठ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उघड चाैकशीत बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. दरम्यान, याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात तलाठी आणि अन्य दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या सूत्रांनी सांगितले, ज्ञानाेबा हणमंतराव करमले (वय ३५, रा. हांगरगा ता. मुखेड जि. नांदेड) हा सध्या उदगीर तालुक्यातील बाेरगाव (बु.), काेदळी येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, १० ऑक्टाेबर २०१२ ते ३१ ऑगस्ट २०२० या काळात बेहिशेबी मालमत्ता जमविल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी करून सत्यता बघून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी ज्ञानाेबा करमले यांच्यावर सापळा लावून ३० ऑगस्ट २०२० राेजी छापा मारला. यावेळी मालमत्तेची उघड चाैकशी करण्यात आली.
यामध्ये त्याने नाेकरीच्या काळात बेकायदेशीररीत्या प्राप्त असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळून आलेल्या अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. एकंदरीत परीक्षण कालावधीदरम्यान तलाठ्याने ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ३४ लाख ७५ हजार ८८६ रुपयांची (९८.६५ टक्के) ची अपसंपदा संपादित केल्याची निष्पन्न झाले आहे.
याबाबत जळकाेट पोलिस ठाण्यात तलाठी ज्ञानाेबा हणमंतराव करमले, अलका ज्ञानाेबा करमले (वय २३), हणमंतराव निवृत्ती करमले (वय ६४ रा. हांगरगा ता. मुखेड जि. नांदेड) याच्याविराेधात गुरनं. २१ / २०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भारतीय दंड संहितेचे कलम १०९ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा - २०१८) चे कलम १३ (२), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी सांगितले.
घराची घेतली झडती...
पथकाने घराची झडती घेतली असून, ही कारवाई पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, अन्वर मुजावर, रमाकांत चाटे, फारुख दामटे, भागवत कठारे, श्याम गिरी, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, दीपक कलवले, संदीप जाधव, मंगेश काेंडरे, गजानन जाधव, रुपाली भाेसले, संताेष क्षीरसागर, आलुरे यांच्या पथकाने केली.