राजकीय दबावाला मांजरा परिवार घाबरणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:22 AM2021-09-26T04:22:30+5:302021-09-26T04:22:30+5:30
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाइन झाली. यावेळी पालकमंत्री अमित ...
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाइन झाली. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीतपराव काकडे, मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल्य उटगे, सर्जेराव मोरे, गणपत बाजुळगे, रवींद्र काळे, श्याम भोसले, पृथ्वीराज सिरसाठ, हणमंत जाधव उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री देशमुख म्हणाले, मागच्या ३० ते ४० वर्षांपूर्वीचे लातूर पाहिल्यास व आता जिल्ह्याचा झालेला विकास, आर्थिक स्रोत, उद्योग, भरारी घेतल्याचे दिसत आहे. त्यात मोठा वाटा लातूर जिल्हा बँक व मांजरा साखर कारखान्याचा असून, यात कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत करण्याची भूमिका आमच्या परिवाराची परंपरा राहिलेली आहे. पुढेही राहील. यात राजकारण केले नाही. त्यामुळे लातूर जिल्हा बँक देशात पहिल्या स्थानी आहे. साखर उद्योगात मांजरा परिवार अव्वल आहे. सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले. कामकाज वाचन कार्यकारी संचालक जितेंद रनवरे यांनी केले.
ऊस उत्पादकांसाठी चांगले दिवस : पालकमंत्री अमित देशमुख
मांजरा परिवाराने वेळोवेळी शेतकऱ्यांचे हित साधले आहे. येणारे दिवस ऊस उत्पादकांचे चांगले दिवस असून, भरपूर पाणी असल्याने अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत सुधारणा करता येईल. मांजरा साखर कारखान्याची दिमाखदार वाटचाल माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पुढेही चालू राहील, अशी ग्वाही पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. आ. धीरज देशमुख म्हणाले, राज्यात १९० साखर कारखाने असून, त्यात एफआरपीप्रमाणे सर्वाधिक शेतकऱ्यांना उसाचे पैसे देणारे साखर कारखाने, हे मांजरा परिवारातील आहेत.