पशुपालकांनो जनावरांना द्या लस अन् ताप, गर्भपात, वासरांचा मृत्यू टाळा
By हरी मोकाशे | Published: January 6, 2024 05:43 PM2024-01-06T17:43:12+5:302024-01-06T17:43:48+5:30
विषाणूजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक लस
लातूर : पशुधनांमध्ये ताप येऊ नये, गर्भपात होऊ नये तसेच विषाणूजन्य आजार उद्भवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात लाळ्या- खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ५ लाख १४ हजार ६४५ जनावरांना लस देण्यात येणार आहे.
वातावरणातील बदलामुळे जनावरांमध्ये विविध आजार उद्भवतात. त्यामुळे पशुपालकांना उपचारासाठी खर्च करावा लागतो. शिवाय, वेळेत उपचार न झाल्यास पशुधन दगावण्याचीही भीती असते. परिणामी, शेतकरी, पशुपालकांची आर्थिक हानी होते. अशाप्रकारचे नुकसान होऊ नये तसेच जनावरे व्यवस्थित रहावीत म्हणून शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वर्षातून दोनदा लाळ्या खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यातील १ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली असून १५ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. प्रत्येक पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.
४ लाख ३७ हजार लसी उपलब्ध...
जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गीय पशुधन ५ लाख १४ हजार ६४५ आहेत. शासनाकडून लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधात्मकच्या ४ लाख ३७ हजार ५०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १२९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्याअंतर्गत गाय व म्हशीस लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात १ लाख ४५ हजार शेळ्या तर ३५ हजार मेंढ्या आहेत. त्यांच्यासाठीही १ लाख ८४ हजार लसी उपलब्ध झाल्या असून त्यांनाही लसीकरण केले जात आहे.
लसीअभावी अशा प्रकारचे होऊ शकतात आजार...
गायी- म्हशीस लाळ्या खुरकत लस न दिल्यास जनावरांत तोंड येणे, ताप येणे, दूध उत्पादनात घट होणे, पशुधनाची कार्यक्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. शिवाय, गर्भपात होणे, लहान वासरु दगावण्याचीही भीती असते. तसेच शेळ्या- मेंढ्यांमध्ये हगवण लागणे, तोंड येणे, ताप येणे, चारा खाणे बंद होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्याचबरोबर लहान पिलांचा मृत्यूहीही होण्याची भीती असते.
पशुधनास लस द्यावी...
जनावरांतील विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गायी- म्हशीस लाळ्या खुरकत लसीकरण करुन घ्यावे. तसेच शेळ्या- मेंढ्यांनाही लस देऊन घ्यावी. त्यामुळे पशुधन व्यवस्थित राहील. सदरील आजार उद्भवण्याची भीती राहणार नाही. लसीकरणासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे.
- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.