राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या दराेडेखाेरांच्या टाेळीला पकडले!
By राजकुमार जोंधळे | Published: June 5, 2023 03:24 PM2023-06-05T15:24:42+5:302023-06-05T15:27:56+5:30
तिघा सराईतांना अटक, दागिन्यांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : विविध जिल्ह्यात घरफाेड्या करत धुमाकूळ घालणाऱ्या दराेडेखाेरांच्या अट्टल टाेळीतील तिघांच्या मुसक्या लातूर पाेलिसांनी रविवारी आवळल्या आहेत. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातून तिघांना उचलण्यात आले आहे. सात घरफाेड्यांची कबुली दिली असून, सोमवारी साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह, राेख रक्कम असा एकूण ४ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोड्यांसह दराेड्यांच्या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आदेश दिले असून, पाेलिसांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा शाेध घेतला. शिवाय, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील गुन्हेगारांचा डेटा कलेक्ट केला. दरम्यान, खबऱ्याने पाेलिसांना माहिती दिली. याच्या आधारे गुन्हेगारांचा माग काढला. लातुरात घरफाेड्या करणारे बीड, अहमदनगर जिल्ह्यात असल्याची माहिती समाेर आली. या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीड, अहमदनगर जिल्ह्यात रवाना झाले. स्थानिक खबऱ्यांची मदत घेत घरफाेडीतील तिघा अट्टल गुन्हेगारांना उचलण्यात आले. अमोल धर्मा इगवे (वय २८, रा. उमापूर ता. गेवराई जि. बीड), गणेश मिलिंद सूर्यवंशी (वय २३, रा. घुमेगाव, ता. गेवराई जि. बीड) आणि विकास सुनील घोडके (वय २७, रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. चाैथा साथीदार फरार झाला असून, सोमवारी सात घरफाेड्या केल्याची कबुली दिली.
यांच्या पथकाने केली कारवाई...
ही कामगिरी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सपोनि. व्यंकटेश आलेवार, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, राजेश कंचे, संतोष देवडे, मोहन सुरवसे, रवी गोंदकर, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील यांच्या पथकाने केली.
शिवाजीनगर, एमआयडीसी हद्दीमध्ये केल्या घरफाेड्या...
लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडी आणि एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत चार घरफोड्या केल्याची कबुली ताब्यातील गुन्हेगारांनी दिली आहे. घरफोडीतील चाेरलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.