लातुरात विसर्जन मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर, २९४७ पाेलीस बंदाेबस्तावर
By राजकुमार जोंधळे | Published: September 8, 2022 07:28 PM2022-09-08T19:28:32+5:302022-09-08T19:29:34+5:30
अन्य जिल्ह्यांतून १ हजार पाेलिसांना केले पाचारण
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १७०० गणेश मंडळांनी यंदा श्री गणरायाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली असून, दरम्यान, शुक्रवारी हाेणाऱ्या गणेशविसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल तीन हजार पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदाेबस्त तैनात केला आहे. मंगळवारी उदगीर येथील तालुक्यातील १०५ मंडळांच्या वतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. उदगीर शहरातील मुख्य मिरवणुकीत ५४ मंडळांनी सहभाग घेतला हाेता.
लातूर शहरासह जिल्ह्यात यंदा एकूण १७०० च्या वर गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठपना केली आहे. यात यंदा ‘एक गाव - एक गणपती’ ही संकल्पना ३५६ मंडळांनी राबविली आहे. गणेशाेत्सव काळात पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी नांदेड, उस्मानाबाद, नाशिक सोलापूर, दौंड (जि. पुणे), हिंगोली जिल्ह्यातून प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी, आणि हाेमगार्ड मागविले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पाेलीस दलाने तगडे नियाेजन केले आहे.
'रेकाॅर्ड'वरील गुन्हेगारांचे सर्च ऑपरेशन...
लातूर जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगारांचे सर्च ऑपरेशन सुरूच आहे. अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गणेश विसर्जन काळासाठी १०० जणांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याबाबत त्यांना नाेटिसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील इतर पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आहे.
तीन हजार जण कर्तव्यावर...
लातूर जिल्ह्यातील गणेशाेत्सवासाठी पाेलीस अधिकारी, कर्मचारी, राखीव दलाची तुकडी आणि हाेमगार्ड असे तब्बल ३ हजार जण सध्या कर्तव्यावर आहेत. यामध्ये पाेलीस अधीक्षक, अप्पर पाेलीस अधीक्षक, उपविभागीय पाेलीस अधिकारी ६, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पाेलीस अधिकारी ३ आणि नियुक्तीवर आलेले उपविभागीय पाेलीस अधिकारी १, पाेलीस कर्मचारी १८००, पाेलीस निरीक्षक - २१, सहायक पाेलीस निरीक्षक, पाेलीस उपनिरीक्षक - १५०, बाहेरील जिल्ह्यातील आलेले ९०० पुरुष हाेमगार्ड आणि १०० महिला हाेमगार्ड, प्रशिक्षणार्थी पाेलीस उपनिरीक्षक ५० आणि २५ महिला, पाेलीस उपनिरीक्षक ३ असे संख्याबळ आहे.