कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट, चार ताब्यात, दोघे पसार
By राजकुमार जोंधळे | Published: September 5, 2022 10:24 AM2022-09-05T10:24:23+5:302022-09-05T10:25:16+5:30
वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी सार्वजनिक ठिकाणी रात्री कोयत्याने केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
लातूर : मित्राच्या वाढदिवसाचा केक चक्क कोयत्याने कापून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे सहा मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या असून, अन्य दोघांनी गुंगारा देत धूम ठोकली आहे. ही घटना लातुरातील इस्लामपुरा परिसरात घडल्याचे समोर आले. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील सम्राट चौक परिसरात राहणारा ऋतिक सुरेश हलगुंडे (वय १८) याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी सार्वजनिक ठिकाणी रात्री कोयत्याने केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान, हा प्रकार सायबर सेल आणि पोलिसांच्या निदर्शनास आला. याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनीही लागलीच शोधमोहीम हाती घेतली. याबाबत खबऱ्याने टीप दिल्यानंतर वाजिद चाँद सय्यद (वय २०, रा. इस्लामपुरा लातूर), संविधान ब्रह्मदेव धावरे (वय १८ रा. राहुल नगर, लातूर), सम्यक शाहूराज कांबळे (वय १९ रा. इस्लामपुरा लातूर) यांच्या मुसक्या आवळल्या. तर अन्य दोघे अमन मुजाहिद दख्खने (रा. इस्लामपुरा लातूर) आणि गोपाळ मदने ( रा. श्रीकृष्ण नगर, लातूर) हे पोलिसांना गुंगारा देत निसटले. त्यांच्या मागावर पोलीस पथक आहे.
याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे एकूण सहा जणांविरोधात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंड जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, बालाजी गोणारकर, ज्ञानोबा देवकते, सहाय्यक फौजदार ढगे, अंमलदार विलास फुलारी, महेश पारडे, खंडू कलकते, राम सोनहिवरे, नारायण शिंदे, अशोक नलावड यांच्या पथकाने केली.