शिक्षण अन् आरोग्य केंद्रस्थानी; लातूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर
By हरी मोकाशे | Published: March 6, 2024 05:54 PM2024-03-06T17:54:08+5:302024-03-06T17:54:32+5:30
समाजकल्याण, कृषी विभागात यंदा नवीन योजना
लातूर : ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांना पायाभूत आणि अत्याधुनिक सोयी- सुविधा पुरविणे तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी प्रोत्साहन देण्याकडे जिल्हा परिषदेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळावी म्हणून भरीव तरतूद जिल्हा परिषदेने आगामी वर्षासाठीच्या शिलकी अंदाजपत्रकात केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनमोल सागर यांच्यासमोर मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ चा ३५ कोटी ४० लाख २६ हजार १३५ रुपयांच्या जमेचा आणि ३० कोटी ८० लाख १४ हजारांच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला. तो प्रशासक सागर यांनी मंजूर केला. विशेषत: सलग तिसऱ्या वर्षी प्रशासकांनी अर्थसंकल्प मंजूर केला आहे. यात ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी- सुविधा, अंगणवाडींना विविध प्रकारचे साहित्य पुरविणे, वन स्टॉप प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे.
पूर्णाकृती पुतळ्यासाठी सव्वा कोटींची तरतूद...
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जिल्हा परिषदेच्या प्रागंणात पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी १ कोटी २० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आगामी पदाधिकाऱ्यांसाठीही २ कोटी १७ लाखांचा भरीव निधी आहे.
आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया कक्ष...
प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा गुणवत्तपूर्ण मिळाव्यात तसेच आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया कक्षासाठी यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा करण्यात येणार आहे.
आधुनिक पध्दतीचे शेतकऱ्यांना बियाणे...
केंद्र शासनाने भरड धान्य वर्ष घोषित केल्याने तसेच ग्रामीण भागात उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत शेती असल्याने त्यातून अधिकाधिक उत्पादन मिळावे म्हणून शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीचे बियाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.
मागास विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल...
समाजकल्याण विभागाअंतर्गत मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्याकरिता १० लाख राहणार आहेत. तसेच वसतीगृहांना पायाभूत सुविधा व इतर सहाय्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या प्रगतीसाठी शेळी गटाकरिता १ कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी दिली.
३५ कोटी ४० लाखांचे अंदाजपत्रक...
सामान्य प्रशासन - ३ कोटी ४३ लाख
शिक्षण - ३ कोटी ९५ लाख
बांधकाम - ४ कोटी ४० लाख
लघुपाटबंधारे - १० लाख
आरोग्य - १ कोटी ३५ लाख
पाणीपुरवठा - ३ कोटी ५० लाख
कृषी - १ कोटी २५ लाख
पशुसंवर्धन - १ कोटी ९७ लाख
समाजकल्याण - ३ कोटी १५ लाख
महिला व बालकल्याण - १ कोटी ९८ लाख
संकीर्ण - २ कोटी ३६ लाख.