झेडपी शाळांत नवोपक्रम केंद्र; खेड्यातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होणार प्रगल्भ!
By हरी मोकाशे | Published: July 12, 2023 07:38 PM2023-07-12T19:38:42+5:302023-07-12T19:39:03+5:30
लातूर जिल्ह्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रमशील केंद्र सुरु करण्यात आले आहेत.
लातूर : सध्या जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये गुणवत्तेची स्पर्धाच आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आघाडीवर रहावेत. तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात म्हणून शासनाने जिल्ह्यातील २० शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रम केंद्र सुरु केले आहेत. त्यामुळे या शाळांतील मुले जवळपास २५६ प्रयोग तयार करुन अध्ययन करीत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन अन् गणितीय क्रियांची माहिती वाढावी म्हणून शासनाच्या वतीने जिल्ह्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रमशील केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, गणितीय क्रियांसाठीचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यातून जवळपास २५६ प्रयोग तयार होतात. या केंद्रामुळे प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थी साहित्यकृती तयार करीत आहेत.
सात तालुक्यातील शाळांचा समावेश...
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी ॲण्ड इनोव्हेशन सेंटर हे जिल्ह्यातील सात तालुक्यातील एकूण २० जिल्हा परिषद शाळांमध्ये आहेत. त्यात गुडसूर, लोहारा (ता. उदगीर), महापालिका शाळा क्र. ९, शासकीय वसाहत, तांदुळजा, बोरी, वांजरखेडा, भोईसमुद्रगा (ता. लातूर), जवळगा, बोरोळ, देवणी (ता. देवणी), साकोळ, अंकुलगा राणी (ता. शिरुर अनंतपाळ), खरोळा, पानगाव (ता. रेणापूर), चाकूर, नळेगाव (ता. चाकूर), निटूर, राठोडा, माळेगाव (ता. निलंगा) या शाळांचा समावेश आहे.
इंद्रधनुष्य निर्मिती कशी होते?...
या केंद्रात इंद्रधनुष्य निर्मिती कशी होते, वीज कशी तयार होते, मॅग्नेटिक कार, साधे तारा यंत्र, एलईडी, चार पायांचा रोबाेट, ड्रोन, पवनचक्की अशा एकूण २५६ प्रयोगाचे साहित्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टीकोन वाढीस मदत होत आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव...
ही प्रयोगशाळा अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतात. प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पाठांतर कमी होण्यास मदत होत आहे.
- डॉ. सतीश सातपुते, उपक्रमशील शिक्षक.