राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच केंद्रातील सरकार पडणार: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:17 PM2024-11-09T12:17:41+5:302024-11-09T12:18:41+5:30
काँग्रेसचा सर्वधर्म समभावाचा विचार कसा नष्ट करता येईल यासाठी भाजपा खेळ करीत आहे.
लातूर/ निलंगा/ रेणापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच दिल्लीत कुबड्यांवर असलेले सरकार पडणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे शुक्रवारी केले.
लातूर, निलंगा, रेणापूर येथे काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या धाेरणावर कडाडून टीका केली. मंचावर उमेदवार माजी मंत्री आ. अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे उमेदवार आ. धीरज देशमुख, निलंग्याचे उमेदवार अभय साळुंके, अल्पसंख्यांक विभगाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. वजाहत मिर्जा, खा. डॉ. शिवाजी काळगे, माजी खा. सुधाकर श्रृंगारे, माजी आ. रामहरी रूपनर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नाना पटोले म्हणाले, काँग्रेसचा सर्वधर्म समभावाचा विचार कसा नष्ट करता येईल यासाठी भाजपा खेळ करीत आहे. राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून देशात भ्रष्टाचाराची स्पर्धा झाली तर महाराष्ट्र अव्वल येईल. सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी रेटकार्ड ठरले आहे, त्यासाठी सर्वसामान्यांची लूट होत आहे. या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचे नाही, सत्तेच्या जोरावर संविधान संपविण्यासाठी यांचे षडयंत्र आहे. शिवद्रोही आणि गुजरातधार्जिणे हे महायुतीचे सरकार सत्तेतून हद्दपार करण्याची गरज आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर येणार असून लाडक्या बहिणींना तीन हजार, मोफत बस प्रवास आणि सुशिक्षित बेरोजगारांना ४ हजार रूपये भत्ता, शेतीमालाला हमीभाव, लातूरला डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सरकारी कचेऱ्यांना दलालांनी घेरले
सभेत माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले, शासकीय कार्यालयांना दलालांनी घेरले आहे. हे चित्र महाविकास आघाडीचे सरकार येताच बदलून टाकू. महायुतीने महागाई, बेरोजगारी वाढविली. साेयाबीनला भाव नाही, कायदा सुव्यवस्था ढासळली, अशीही टीका त्यांनी केली.