रविवारीच सीईओ अनमोल सागर यांनी घेतला पदभार
By हरी मोकाशे | Published: July 23, 2023 08:42 PM2023-07-23T20:42:23+5:302023-07-23T20:42:33+5:30
शिक्षण, आरोग्यकडे विशेष लक्ष : सीईओ
लातूर : जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी पदभार स्विकारला. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेतली. शिक्षण, आरोग्य, अंगणवाडीकडे विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे सीईओ सागर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांची धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याने त्यांचा जागी अनमाेल सागर हे रुजू झाले आहेत. त्यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कामकाजाची माहिती घेतली.
दरम्यान, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. सीईओ सागर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्ष परीविक्षाधीन कार्य केले. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षे कार्य केले. शिक्षण, आरोग्य आणि अंगणवाडींचा आणखीन दर्जा सुधारण्यासाठी आपले विशेष लक्ष राहणार आहे. तत्कालिन सीईओ गोयल यांनी यासंदर्भात केलेल्या कामास आणखीन गती देण्याबरोबर जिल्हा परिषदेचा प्रत्येक विभाग लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे सीईओ सागर यांनी 'लोकमत'शी सांगितले.