चाकूरच्या अभियंत्याच्या दुचाकीला राजस्थानात अपघात, पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:38 PM2022-07-18T23:38:00+5:302022-07-18T23:38:51+5:30
Latur : उपचारादरम्यान मनीषा माकणे यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाकूर (जि. लातूर) : येथील अभियंता अभिषेक माकणे व त्यांची पत्नी मनीषा माकणे हे रविवारी राजस्थानच्या कोटा शहरातून दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव कारने जोराची धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान मनीषा माकणे यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाकूर येथील रहिवासी असलेले राजू माकणे यांचे सध्या औरंगाबाद येथे वास्तव्य आहे. त्यांचा मुलगा अभिषेक माकणे (२९) याचा विवाह वडवळ (नागनाथ) येथील मनीषा (२६) बरोबर एक महिन्यापूर्वीच झाला होता. अभिषेक माकणे यांना कोटा येथे एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून नोकरी आहे. लग्नानंतर ते पत्नीसह कोटा येथे राहण्यास गेले होते. रविवारी सुटी असल्याने अभिषेक व मनीषा दुचाकीवरून राजस्थानमधील कोटा - बोरा (क्रमांक२७) या महामार्गावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की दोघेही १० ते १२ फूट उंचावरून एका शेतात जाऊन पडले. या अपघातात अभिषेक व मनीषा यांना गंभीर मार लागला होता. सिमल्या गावानजीकच्या कस्बे टोल नाक्यापासून काही अंतरावर ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. त्यावेळी तेथील लोकांनी त्या दोघांना कोटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु उपचार सुरू असताना मनीषा यांचा मृत्यू झाला. त्यांची उत्तरणीय तपासणी करून सोमवारी मनीषाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चाकूर येथे आणण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महिनाभरापूर्वी झाला होता विवाह
अभियंता असलेल्या अभिषेकचा विवाह महिनाभरापूर्वीच झाला होता. कोटा शहरात एका खाजगी कंपनीत नोकरीला असल्याने पती, पत्नी दोघेही राजस्थानला गेले होते. रविवारी झालेल्या अपघातात पत्नी मनीषा यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.