संधीचे केलं सोनं! बेस्ट पिचर ज्योती पवारची आशिया कपसाठी भारतीय बेसबॉल संघात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 03:09 PM2023-05-09T15:09:39+5:302023-05-09T15:11:47+5:30
लातूरच्या ज्योती पवारची आंतरराष्ट्रीय झेप; घरची परिस्थिती साधारण असल्याने आर्थिक पाठबळाची गरज
- महेश पाळणे
लातूर : प्रभावी पिचिंगच्या जोरावर अनेकवेळा मैदाने गाजविणाऱ्या लातूरच्या ज्योती पवारने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बेसबॉल खेळात उड्डाणे कायम ठेवली आहेत. हाँगकाँग येथे होणाऱ्या महिलांच्या एशियन कप स्पर्धेत भारतीय संघात आपली निवड पक्की करून दुसऱ्यांदा ही किमया साधली आहे.
औसा तालुक्यातील नांदुर्गा तांडा येथील रहिवासी असणारी ज्योती व्यंकट पवार हिने बेसबॉल खेळात आपली लय कायम राखत हे यश गाठले आहे. उदगीरच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात बीपीएडचे शिक्षण घेणाऱ्या ज्योतीने राष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाच्या सराव शिबिरात निवड पक्की केली होती. तेथेही उत्कृष्ट प्रदर्शन करीत भारतीय संघात आपली निवड सार्थक ठरविली आहे. हाँगकाँग येथे २१ मे ते २ जून दरम्यान होणाऱ्या एशियन बेसबॉल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला प्रा. अनिरुद्ध बिराजदार, दैवशाला जगदाळे, रत्नराणी कोळी, शिवाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यातील बेस्ट पिचर...
उत्कृष्ट पिचर म्हणून राज्यभरात ज्योतीची छाप आहे. शालेय जीवनात जिजामाता व महाविद्यालयीन जीवनात राजर्षी शाहू महाविद्यालयाकडून खेळताना तिने अनेकवेळा लातूरला पदके मिळवून दिली आहेत. यापूर्वी चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यासह १६ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत पदकांची लयलूट केली आहे.
आर्थिक पाठबळाची गरज...
घरची परिस्थिती साधारण असल्याने ज्योतीला अनेकवेळा आर्थिक चणचण खेळाच्या निमित्ताने जाणवली आहे. एका राष्ट्रीय स्पर्धेत तर तिच्या आईने आपले दागिने विकून तिला स्पर्धेला पाठविली होते. हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही तिला लाखभर रुपयांचा खर्च आहे. यात प्रवास खर्च, व्हिसा शुल्क, कॅम्प शुल्क, गणवेश व खेळाच्या साहित्याचा समावेश आहे.
संधीचे केले सोनं...
यापूर्वी ज्योतीची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, त्यावेळी महिलांच्या स्पर्धा रद्द झाल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये तिने चीन येथे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. आता २०२३ मध्ये होणाऱ्या एशियन स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने दुसऱ्यांदा भारतीय संघाकडून खेळण्याची संधी तिला मिळाली आहे.