बदलती जीवनशैली, नकारात्मक विचार देत आहेत कर्करोगाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 07:20 PM2020-02-10T19:20:59+5:302020-02-10T19:22:53+5:30

कर्करोग झालेल्या रूग्णांनी औषधोपचाराबरोबरच ध्येय, इच्छाशक्ती आणि सकारात्मक भावना ठेवल्यास या आजारातून मुक्तता मिळते.

Changing lifestyles, negative thoughts are giving rise to cancer | बदलती जीवनशैली, नकारात्मक विचार देत आहेत कर्करोगाला बळ

बदलती जीवनशैली, नकारात्मक विचार देत आहेत कर्करोगाला बळ

Next
ठळक मुद्देआजार झाला म्हणून चिंताग्रस्त न राहता योद्धा म्हणून त्याचा मुकाबला करायोग्य वेळी निदान झाल्यावर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

- आशपाक पठाण 

लातूर : महाराष्ट्रात कॅन्सरच्या आजाराचे प्रमाण मागील दहा वर्षांपासून दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बदलती जीवनशैली, नकारात्मक विचार, वाढते धुम्रपान, शारीरिक कष्टाचा अभाव, राग, द्वेष, एकटेपणा वाढत असल्याने याच गोष्टी कर्करोगाला पूरक ठरत आहेत. कर्करोग झालेल्या रूग्णांनी औषधोपचाराबरोबरच ध्येय, इच्छाशक्ती आणि सकारात्मक भावना ठेवल्यास या आजारातून मुक्तता मिळते. त्यामुळे आजार झाला म्हणून चिंताग्रस्त न राहता योद्धा म्हणून त्याचा मुकाबला करा, असे अमरावती येथील जीवनशैली व आरोग्य विषयाचे अभ्यासक डॉ. अविनाश सावजी यांनी सांगितले.

मागील वर्षांपासून अहमदनगर येथील आरंभ व अमरावतीच्या प्रवास संस्थेच्या पुढाकारातून डॉ. अविनाश सावजी हे कॅन्सर प्रबोधन यात्रा काढतात. यावर्षी २ फेब्रुवारीला निघालेली यात्रा बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात गेली. यात्रेच्या माध्यमातून कर्करोग झालेल्या रूग्णांचे मनोबल वाढविणे आणि आजारापासून दूर राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर प्रबोधन केले जात असल्याचे सांगत डॉ. सावजी म्हणाले, कॅन्सरबाबत लोकांच्या मनामध्ये भीती आहे़ मागील दहा वर्षांपासून याचे प्रमाण वाढत आहे. सामान्य लोक जागरूक व्हावेत, योग्य वेळी निदान झाल्यावर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे जीवनशैलीत थोडासा बदल आणि उपचार घेत असताना स्वत:मध्ये ध्येय आणि आत्मविश्वास आवश्यक आहे.

या गोष्टी देतात कर्करोगाला बळ...
शहरी भागात कष्टाच्या सवयी कमी झाल्या आहेत. बैठी जीवनशैली, वाढते वजन, बीडी, सिगारेट, तंबाखू आदी प्रकारचे व्यसन आरोग्याला हानीकारक आहेत़ शेतीत रसायनांचा वापर, टूथपेस्ट, कॉस्मेटिक, फवारणी केलेल्या पालेभाज्या, घराचा केमिकलयुक्त रंग या बाबी कर्करोगाला खतपाणी घालत आहेत. जगण्यामध्ये आलेली नकारात्मकता, भावना, राग, द्वेष, एकटेपणा वाढत चालला आहे. व्यसनाबरोबरच या गोष्टीही कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

पुरूषांमध्ये तोंडाचा तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग...
आपल्याकडे पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर सर्वाधिक आढळून येत आहे़ तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर वाढत चालला आहे. पूर्वी हा आजार ६० ते ७० वर्षे वयोगटात आढळून यायचा़ आता त्याचे वयोमान ३० ते ३५ वर्षांवर आले आहे़ यापासून दूर रहायचे असेल तर धुम्रपान, व्यसनाबरोबरच आहार, विहार, आचार, विचार बदलणे आवश्यक आहे.

कॅन्सर योद्धांनी साधला सात हजार विद्यार्थ्यांशी संवाद...
प्रबोधन यात्रेत कॅन्सर झालेले व त्यातून बरे झालेल्या रूग्णांनी मराठवाड्यातील विविध शाखेच्या वैद्यकीय महाविद्यालये, पोलीस प्रशिक्षण केंद्र, शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात चार कॅन्सर योद्धांनी आपल्याला कोणत्या सवयीमुळे हा आजार बळावला आणि यातून कसे बरे झालो याची माहिती दिली. यातून स्वत:ला व कुटुंबाला झालेला त्रास सांगितल्याने अनेकांच्या मनात या आजाराविषयी जागृती झाली आहे.

शेवटच्या टप्प्यात काळजी महत्त्वाची...
एखाद्या रूग्णाला अंतिम टप्प्यात आजार असल्याचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशा रूग्णांना त्रास कमी व्हावा. यासाठी त्यांचा सांभाळ करणाऱ्या प्रयास व आरंभ या दोन संस्था कार्यरत असल्याचेही डॉ.अविनाश सावजी यांनी सांगितले.

Web Title: Changing lifestyles, negative thoughts are giving rise to cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.