विनयभंग प्रकरणी १६ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: July 16, 2023 05:20 AM2023-07-16T05:20:19+5:302023-07-16T05:20:48+5:30
लातुरातील गांधी चौक पोलिसांची कारवाई
राजकुमार जाेंधळे
लातूर : विनयभंग प्रकरणी लातुरातील गांधी चौक ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १६ तासांच्या आत लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. महिलांविषयक गुन्हे अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्यात लातूर पोलिस सतर्क झाले आहेत, असे या घटनांवरून समोर आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ४२ वर्षीय महिलेला पाहून अश्लील चाळे करून अंगाला हात लावून तसेच तिच्या घराकडे चकरा मारल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर १६ तासांच्या आत आरोपीविरुद्ध लातूर येथील न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिली आहे.
महिला अत्याचार प्रकरणी कुठलीही गय केली जाणार नाही. त्याचबराेबर अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध तातडीने आणि जलदगतीने तपास करून न्यायालयात सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिस संवेदनशील आहेत, असे कासारशिरसी (ता. निलंगा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि लातूर शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे.