गुंठेवारीचे बनावट प्रमाणपत्र देऊन एकाची फसवणूक
By हरी मोकाशे | Published: March 11, 2023 05:04 PM2023-03-11T17:04:59+5:302023-03-11T17:05:31+5:30
याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांत एकाविरुध्द शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर : रेखांकनानुसार प्लॉट अकृषी नसल्यामुळे गुंठेवारी प्रमाणपत्र काढून देतो म्हणून एकाकडून रोख रक्कम घेऊन त्याला बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांत एकाविरुध्द शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी शिवकुमार बस्वराज पांडे (रा. तोंडार), ताजुद्दीन चाँदपाशा शेख (रा. उदगीर), धनराज नागोराव पाटील (रा. रावणकाेळा, ता. मुखेड) या तिघांनी उदगीरातील सर्वे नंबर २२१/३ ची मधील प्लॉट क्र. ३८ हा संयुक्त मालकीने खरेदी केला होता. परंतु, या प्लॉटचा मंजूर रेखांकन अकृषी झालेला नसल्यामुळे त्यांनी गुंठेवारी प्रमाणपत्र काढण्यासाठी आरोपी अतीक लईक शेख (रा. हावगीस्वामी चौक, उदगीर) याला उदगीर पालिका कार्यालयातून प्लॉटचे नामांतर गुंठेवारी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मार्च २०२० मध्ये कागदपत्र देऊन शुल्कापोटी २७ हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्याने १७ मे २०२१ रोजी नियमाधिन परवाना पत्र दिले. त्यानंतर फिर्यादीने तो प्लॉट २७ ऑक्टोबर २०२१ रोजी काशीराम रामराव राठोड (रा. सकनूर, ता. मुखेड) यांना विक्री केला.
परंतु, १७ डिसेंबर २०२१ रोजी फिर्यादीस समजले की, अतिक लईक शेख व इतर तिघांवर बनावट गुंठेवारी प्रमाणपत्र बनवून ते वापरल्याबद्दल शहर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे फिर्यादीस शंका आल्याने त्यांनी पालिकेकडे अर्ज करून माहिती घेतली असता त्यांना देण्यात आलेला परवाना बनावट असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावरुन फिर्यादी शिवकुमार पांडे (रा. तोंडार, ता. उदगीर) यांनी शुक्रवारी उदगीर शहर पोलिसांत तक्रार दिल्याने आरोपी अतिक लईक शेख (रा. उदगीर) याच्याविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.