जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीत; ग्रामसेवक गायब!
By हरी मोकाशे | Published: May 16, 2024 08:13 PM2024-05-16T20:13:48+5:302024-05-16T20:14:11+5:30
तात्काळ नोटिसा बजावण्याच्या सूचना.
लातूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी अचानक शहरानजिकच्या चार गावांतील ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील कारभाराची माहिती घेतली. तेव्हा दोन ठिकाणी ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचे आढळले तर एका ठिकाणी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सीईओंनी तात्काळ नोटिसा बजावण्याच्या सूचना पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेवर जवळपास दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पदाधिकारी नसल्याने अनेकदा गाव पातळीवरील अडीअडचणी जिल्हा परिषदेपर्यंत पाेहोचत नाहीत. त्यामुळे समस्यांची उकल होत नाही. शिवाय, ग्रामपंचायतस्तरावरील सर्व रेकाॅर्ड अद्ययावत आहे का याची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी गुरुवारी दुपारी ३ ते ५.३० वा. च्या सुमारास तालुक्यातील गंगापूर, चांडेश्वर, खोपेगाव, वासनगाव येथील ग्रामपंचायतीस अचानक भेटी देऊन झाडाझडती घेतली. यावेळी सीईओंनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रामपंचायत इमारत, ग्रामपंचायतचे सर्व रेकॉर्ड, वीजबिलमुक्तीसाठीचे प्रयत्न अशा विविध बाबींची तपासणी केली.
या तपासणीदरम्यान गंगापूरच्या ग्रामपंचायतीतील रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे आढळले. तसेच खोपेगाव येथील ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. वासनगावातही तशीच परिस्थिती होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या विद्युत मोटारीच्या दुुरुस्तीसंदर्भातील गेलो होतो, असे तेथील ग्रामसेवकांनी सांगितले.
नोटिसा बजावून कार्यवाही होणार...
जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी गुरुवारी दुपारी अचानकपणे चार ग्रामपंचायतींना भेटी देऊन झाडाझडती केली. बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे आढळले. तसेच दोन ठिकाणी ग्रामसेवक अनुपस्थित होते. त्याची सीईओंनी गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ नोटिसा बजावण्याच्या सूचना केल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी सांगितले.