मुलांनी आवडीच्या क्षेत्रात करीअरचा मार्ग निवडावा : प्रतीक्षा काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:17 PM2019-06-01T18:17:31+5:302019-06-01T18:19:34+5:30
प्रतीक्षा काळे या वनविभाग परीक्षेत मुलीत राज्यात प्रथम आल्या आहेत
- आशपाक पठाण
इंजिनिअरिंग व मेडीकल हे दोनच पर्याय आपल्याकडील मुले निवडतात़ बारावीनंतर करिअरसाठी अनेक मार्ग आहेत़ मुलींनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतली आहे़ वाढत्या स्पर्धेच्या युगात कुठलेही क्षेत्र आता ठराविक लोकांसाठी राहिलेले नाही़ त्यामुळे तरूणांनी आवडीच्या क्षेत्रात करीअर करणे महत्त्वाचे आहे़ त्यात सर्वात उत्तम पर्याय सिव्हील सर्व्हिसेसचा असल्याचे मत लोकसेवा आयोगाच्या वनविभागाच्या परीक्षेत राज्यात मुलीत प्रथम आलेल्या प्रतीक्षा काळे यांनी व्यक्त केले़
शालेय, महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले?
पहिली ते सातवी लातूरच्या लोकमान्य टिळक विद्यालय़ सातवी ते दहावी सरस्वती विद्यालय, ११ वी १२ वी राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले़ त्यानंतर पुणे येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिक शाखेतून पदवी मिळविली़
स्पर्धा परीक्षेकडे का वळलात?
सिव्हील सर्व्हिसेस मध्येच करिअर करायचे ध्येय सातवी, आठवीतच ध्येय निश्चित केले होते़ लोकांमध्ये काम करण्याची इच्छा आहे़ करीअर आणि एज्युकेशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत़ अभियांत्रिकीची पदवी घेताना तिच्याकडे रोजगार म्हणून मी कधीच पाहिले नाही़
मेडिकल इंजिनिअरिंगपेक्षा वेगळी वाट कशी शोधावी?
आपल्याकडील मुलांना दोनच पर्याय माहित आहेत़ इंजिनिअरिंग, मेडिकलचा लातूर पॅटर्न आहे़ मध्यम, उच्चवर्गातील मुले सायन्सला जातात़ सर्वांनी एकाच मार्गावर न जाता सिव्हील सर्व्हीसेसकडे वळले पाहिजे़ हाच सर्वात उत्तम पर्याय आहे़ कोणतेही क्षेत्र ठराविक व्यक्तींसाठी नाही़ त्यामुळे मुलींनी सर्व क्षेत्रात करीअर केले पाहिजे़ अभियांत्रिकीत केवळ मुले प्रवेश घ्यायचे़ आता मुलींचेही प्रमाण वाढले आहे़ माझ्या अनेक सहकारी अभियांत्रिकीत उच्च पदावर आहेत़
कुटुंबाने दिले करिअर निवडीचे स्वातंत्र्य
आई गृहिणी, वडील नानासाहेब काळे राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राध्यापक आहेत़ लहानपणापासूनच घरात शैक्षणिक वातावरण़ करिअर निवडायचे स्वातंत्र्य दिल्याने मी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला़ मुलींनी सिव्हील सर्व्हिसेसकडे जाऊ नये, असा अनेकांचा समज आहे़ मी मात्र अभियांत्रिकीची पदवी घेऊन युपीएससीचा अभ्यास करीत आहे़ वनविभागाच्या परीक्षेत यश मिळाले असले तरी माझे उद्दीष्ट आयएएस व्हायचे आहे़ लोकसेवा आयोगाची मी पहिल्यांदाच परीक्षा दिली़ यासाठी कुठलेही कोचिंग नव्हते़ घरीच अभ्यास करून परीक्षा दिली़ युपीएससीचा अभ्यास सुरू असल्याने परीक्षा सोपी गेली़ मुलाखतीतही मी टॉपर होते़ माझे ध्येय आयएएस व्हायचे आहे़ त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत़