बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'!

By हरी मोकाशे | Published: August 12, 2023 06:26 PM2023-08-12T18:26:01+5:302023-08-12T18:26:25+5:30

महापालिका प्रशासन बेजार; शहरात अडीच महिन्यांत सहा पॉझिटिव्ह

Children suffering from dengue-like illness; Municipal Corporation's 'fever' increased! | बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'!

बालके डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त; महापालिकेचा वाढला 'ताप'!

googlenewsNext

लातूर : सध्या शहरात डेंग्यूसदृश आजाराचा प्रादुर्भाव असल्याने बालके अंगदुखी, तीव्र ताप अशा वेदनेने त्रस्त होत आहेत. परिणामी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी बालक रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, अडीच महिन्यांच्या कालावधीत शहरात ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

पावसाळ्याच्या कालावधीत डेंग्यूसदृश आजार वाढतात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतात. शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने दोन महिन्यांपासून जनजागृतीबरोबर सर्वेक्षण, ॲबेटिंग मोहीम राबविण्यात येत आहे. घराच्या छतावर अथवा अंगणात टायर्स, निरुपयोगी भंगार साहित्य ठेवू नये. तसेच या साहित्यासह फ्रीज, कुलर, प्लाॅवर प्लॉट अशा वस्तूंमध्ये पाणी साचू नये म्हणून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाय, गृहभेटी देऊन दक्षता घेण्याचा सल्ला दिला जात आहे. ही मोहीम सुरु असली तरी डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेषत: बालकांचे प्रमाण अधिक आहे.

दर रविवार कोरडा दिवस पाळावा...
डेंग्यूसदृश आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दर रविवार कोरडा दिवस पाळावा. तसेच घराच्या छतावर, अंगणात, अडगळीच्या ठिकाणी असलेले निरुपयोगी साहित्य, टायर्सची विल्हेवाट लावावी. त्यात पावसाचे पाणी साचू देऊ नये. पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले आहे.

लहान मुलांना जपावे...
शहरात जून ते आतापर्यंत डेंग्यूचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, ॲबेटिंग मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी. विशेषत: लहान मुलांना अधिक जपावे. अंगभरून कपडे वापरावेत. एक-दोन दिवस ताप असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. महेश पाटील, आरोग्याधिकारी, मनपा.

आठवडाभरात तीन पॉझिटिव्ह...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आठवडाभरात डेंग्यूसदृश १० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी तीन पॉझिटिव्ह रुग्ण होते. डेंग्यूचा सर्वात अगोदर प्रादुर्भाव बालकांना होतो. विशेषत: सध्या या आजाराची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे लक्षणे दिसून येताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण पहिले तीन-चार दिवस खूप महत्त्वाचे असतात.
- डॉ. शिवप्रसाद मुंदडा, बालरोग विभागप्रमुख.

पावसाच्या उघडझापीने चिंता वाढविली...
जिल्ह्यात जवळपास १०-१२ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचून एडिस इजिप्ती डासाची पैदास होण्याची भीती आहे. सतत पाऊस राहिल्यास पाणी साचत नाही. सध्याच्या परिस्थितीत शहराबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

ही लक्षणे दिसताच काळजी घ्या...
तीव्र ताप येणे, अंगदुखी, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांच्या पाठीमागे दुखणे, पोट दुखून उलट्या होणे, लाल चट्टे येणे, अंग सुजणे अशी डेंग्यूच्या आजाराची लक्षणे आहेत.

Web Title: Children suffering from dengue-like illness; Municipal Corporation's 'fever' increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.