हेव्यादाव्यांमध्ये अडकली आदर्श ग्रामसेवकांची निवड! लातूरात चार वर्षांपासूनचे पुरस्कार रखडले
By हरी मोकाशे | Published: December 27, 2023 06:22 PM2023-12-27T18:22:26+5:302023-12-27T18:22:39+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी तालुकापातळीवर आदर्श ग्रामसेवकांची निवड करून सन्मानित करण्यात येते.
लातूर : ग्रामपंचायतीच्या सर्व नोंदी, मासिक ग्रामसभा, करवसुली २५ बाबींमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात येते. त्यासाठी प्रस्तावही मागविण्यात आले होते. दरम्यान, ग्रामसेवकांचे अंतर्गत हेवेदावे अन् तक्रारींत निवड प्रक्रिया थांबली आहे. परिणामी, वास्तवात गावपातळीवर उत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रामसेवकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
गावच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असते. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे कार्य ते करतात. ग्रामपंचायतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि कामकाज करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी तालुकापातळीवर आदर्श ग्रामसेवकांची निवड करून सन्मानित करण्यात येते. कोविडचा प्रादुर्भाव व तत्कालीन काही कारणांमुळे तालुकास्तरीय आदर्श ग्रामसेवकांची निवड चार वर्षांपासून रखडली आहे. ही निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला. मात्र, निवड समितीच्या बैठकीपूर्वीच तक्रारी येत आहेत. परिणामी, निवड थांबली आहे.
आगाऊ वेतनवाढ नसतानाही तक्रारी...
सन २०१७ पूर्वी निवडल्या गेलेल्या आदर्श ग्रामसेवकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्यात येत होती. तद्नंतर शासनाच्या निर्देशानुसार ती वेतनवाढ बंद झाली. आता केवळ मान-सन्मान केला जात आहे. तरीही तक्रारी येत असल्याने निवड प्रक्रिया थांबली आहे. सन २०१९ ते २०२३ या चार वर्षांतील निवड प्रक्रिया थांबली आहे. प्रत्येक तालुक्यातून एक अशा पद्धतीने चार वर्षांतील ४० ग्रामसेवकांचा गौरव होणे अपेक्षित आहे.
निलंगा तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव...
तालुका - प्रस्ताव
औसा - ०५
शिरूर अनं. - ०८
लातूर - ०५
जळकोट - ०४
अहमदपूर - ०६
उदगीर - ०५
रेणापूर - ०८
देवणी - ०६
चाकूर - ०४
निलंगा - १०
एकूण - ६१
निवडीपूर्वीच तक्रारींचा वाढला भडीमार...
आदर्श ग्रामसेवक निवडीसाठी राज्य शासनाने २५ निकष लागू केले आहेत. त्यास एकूण ४०० गुण आहेत. त्यात सर्वाधिक गुण घेणाऱ्या ग्रामसेवकांची निवड केली जाते. ४० आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी ६१ प्रस्ताव दाखल झाले आहेत. दरम्यान, सीईओ, अतिरिक्त सीईओ, पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ, ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधी यांची समिती निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक होण्यापूर्वीच तक्रारींचा भडीमार वाढला आहे.
अन् जिल्हा परिषदेने नियम केले कडक...
वाढत्या तक्रारी पाहून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने निवडीचे नियम अधिक कडक केले आहेत. सदरील ग्रामसेवक विभागीय चौकशीत दोषी सिद्ध झाला आहे का, गुन्हा नोंद आहे का, पाच वर्षांत निवड झाली आहे का, गंभीर अनियमितता अथवा अपहाराच्या बाबीत समावेश आहे का हे पाहिले जाणार आहे. शिवाय, चारित्र्य प्रमाणपत्र असणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
सखाेल पडताळणीनंतर निवड केली जाणार...
हेव्यादाव्यांमुळे तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाच्या निकषाबरोबरच जिल्हा परिषदेने काही नवीन नियम लागू केले आहेत. या सर्वांची पडताळणी करुन निवड केली जाणार आहे. अत्यंत पारदर्शकपणे निवडी समितीमार्फत ही प्रक्रिया होणार आहे.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.