१० ग्रामपंचायतींत चुरशीच्या लढती, राजकीय मंडळींची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:02 AM2021-01-08T05:02:24+5:302021-01-08T05:02:24+5:30
जळकोट : तालुक्यातील २७ पैकी केवळ एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने आता उर्वरित २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ...
जळकोट : तालुक्यातील २७ पैकी केवळ एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने आता उर्वरित २६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येथील २१७ जागांसाठी ५०८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या १० ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीय मंडळींनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे तिथे चुरशीच्या लढती होणार आहेत.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातील तिरुका ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने आणि १५० जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता २१७ जागांसाठी ५०८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. तालुक्यातील वांजरवाडा, कुणकी, विराळ, सोनवळा, बेळसांगवी, धामणगाव, डोंगरकोनाळी, घोणसी, रावणकोळा, अतनूर, मरसांगवी या दहा ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींवर सर्व राजकीय मंडळींचे लक्ष वेधले आहे.
येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी, शिवसेना अशा विविध पक्षांच्या राजकीय मंडळींनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके यांच्या कुणकी, अनिता परगे यांच्या घोणसी ग्रामपंचायतीत अटीतटीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. विद्यमान सभापती बालाजी ताकबिडे यांच्या वांजरवाडा ग्रामपंचायतीत तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषद सदस्या रुक्मिणीबाई जाधव यांच्या विराळ ग्रामपंचायतीत प्रतिष्ठेची लढत होत आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे यांच्या गावातील ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होत आहे.
स्थानिक पातळीवरील राजकारण...
बेळसांगवी येथे जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या पॅनलच्या विरोधात त्यांच्या भावाने पॅनल उभे करून त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले यांच्या डोंगरकोनाळी ग्रामपंचायतींमध्येही दुरंगी लढत होत आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे यांच्या सोनवळा ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंचाचे पती, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांचे पॅनल असून, गंगाधर भोसले यांनी तिसरी आघाडी करून तिसरे पॅनल उभे केले आहे. जिल्हा परिषद सदस्या अनिता परगे यांच्याविरोधात दत्ता घोणसीकर यांचे पॅनल आहे.
अतनूरमध्ये साहेबराव पाटील येवले यांच्याविरोधात गव्हाणे पाटील यांचे पॅनल असून, दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील प्रमुख १० गावांतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे चुरशीच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.