सिनेस्टाइल पाठलाग करून ८ लाखांचा गुटखा पकडला
By राजकुमार जोंधळे | Published: August 19, 2023 07:43 AM2023-08-19T07:43:08+5:302023-08-19T07:43:25+5:30
एकास अटक : औसा ठाण्यात गुन्हा दाखल
औसा (जि. लातूर) : लगतच्या धाराशिव जिल्ह्यातून औशाकडे चाेरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पाेचा ३० किलाेमीटर सिनेस्टाइल पाठलाग करून, आठ लाखांचा गुटखा भादा पाेलिसांनी शिवली येथे पकडला असून, एकाला अटक केली आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा येथील सज्जाद शेख हा चाेरट्या मार्गाने बंदी असलेला गुटखा, पानमसाल्याची वाहतूक करत होता. दरम्यान, मध्यरात्री धाराशिव जिल्ह्यातून टेम्पो (एम.एच. २४ जे. ६९२४) पानमसाला आणि इतर कंपनीच्या जवळपास ३ लाख ७७ हजारांचा गुटख्याची चाेरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे भादा पाेलिसांनी लातूर-धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर शिवली येथे सापळा लावला. धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीतून आलेला टेम्पाे लातूर जिल्ह्याच्या हद्दीतील शिवलीत येत असल्याचे दिसून आले. पाेलिसांना गुंगारा देत चालकाने टेम्पाे औशाच्या दिशेने पळविला. भादा पोलिसांनी तब्ब्ल ३० किलाेमीटर पाठलाग करून गुटख्यासह टेम्पो औसा टी-पाॅइंटवर पकडला.
यावेळी गुटख्यासह एकाला अटक करण्यात आली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि. बाळासाहेब डोंगरे, सहायक फौजदार देवकर, हेकॉ. जनार्दन फड यांच्या पथकाने केली.