काळेवाडीच्या नागरिकांना पाण्यात कसरत करीत शोधावी लागतेय वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:43 AM2021-09-02T04:43:45+5:302021-09-02T04:43:45+5:30
रेणापूर नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. १चा भाग असलेल्या काळेवाडीची लोकसंख्या १२०० आहे. गावात जिल्हा परिषद शाळेसह चार रस्ते आहेत. ...
रेणापूर नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. १चा भाग असलेल्या काळेवाडीची लोकसंख्या १२०० आहे. गावात जिल्हा परिषद शाळेसह चार रस्ते आहेत. मात्र, गावात नागरी सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाल्या, पक्के रस्ते नाहीत. पाऊस झाला की, गावातील रस्त्यावर पाणी साचते. पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी सुविधा नसल्यामुळे ते रस्त्यावरच जमा होऊन तुंबत आहे.
सोमवारपासून शहरासह तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे काळेवाडीतील चारही रस्त्यांवर पाणी साचले आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना कार्यान्वित नाही. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हातपंप आहे. त्या हातपंपाचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. सततच्या पावसामुळे गावातील सर्व रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच कुंभार गल्ली, रेणापूर- काळेवाडी- टाकळगाव रस्ता, मुख्य चौकात पाणी तुंबले आहे. या पाण्यातून नागरिकांना रस्ता शोधावा लागत आहे. नागरी सुविधांसाठी ग्रामस्थांनी वारंवार नगरपंचायत, तहसील कार्यालयासह लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु, अद्याप प्रश्न संपुष्टात आला नाही. नगरपंचायतीने तत्काळ याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी काळेवाडीतील प्रदीप काळे, उमाकांत येनतफळे, दीपक काळे, गोविंद काळे, प्रमोद गायकवाड, मोरेश्वर मोरे, विजयकुमार येनतफळे, अभिलाष काळे, शरद मोरे, लक्ष्मण काळे, श्रीमंत काळे, बापू देवळकर, राजकुमार नरवटे, भागवत वडजकर, भरत काळे आदींनी केली आहे.