शहरी भागासाठीही लवकरच स्पर्धा; शहरवासीयांनी पाणलोटची कामे करावीत- अमीर खान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 04:51 PM2018-05-01T16:51:46+5:302018-05-01T20:15:10+5:30
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी औसा तालुक्यात 'तुफान' आले असून, आपले गाव पाणीदार करण्यासाठी महाराष्ट्र दिनी फत्तेपूर येथे महाश्रमदान करण्यात आले.
राजकुमार जोंधळे/ महेबुब बक्षी
लातूर / औसा : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी औसा तालुक्यात 'तुफान' आले असून, आपले गाव पाणीदार करण्यासाठी महाराष्ट्र दिनी फत्तेपूर येथे महाश्रमदान करण्यात आले. यावेळी पाणी फाऊंडेशनचे प्रमुख सिने अभिनेते अमीर खान व अभिनेत्री अलिया भट यांनी एक तास श्रमदान केले.
मनात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याची संकल्प घेवून श्रमदान करणाऱ्यांना अमीरच्या श्रमदानाने प्रेरणा मिळाली. 'पाणी आडवा जिरवा' यासह वृक्षारोपण, मातीचे परीक्षण, मातीची झिज रोखून त्यामधील गुणधर्माची पुर्तता करावे लागणार आहे. पिकांचे नियोजन करण्याची गरज आहे. आजचे श्रमदान तुमच्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे ठरणार आहे. सर्वानीच या स्पर्धेत सहभागी व्हावे. यात कुणाची हार होणार नसून प्रत्येक जण विजेताच ठरणार आहे. मरावाड्याला दारिद्रयाचा कलंक लागला असून, ते फुसून टाकण्यासाठी नामी संधी आली आहे. त्याचा पुरेपुर उपयोग करुन घ्या. शहरी भागातील नागरिकांनीही पाणलोटची कामे करावीत. त्यांच्यासाठीही स्पर्धा सुरू केली जाईल, असे अभिनेता अमिर खान याने सांगितले.
औसा तालुक्यातील फत्तेपुर येथे सकाळी ६:४५ वाजल्यापासून श्रमदान करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्यानिमित्ताने या गावात महाश्रमदान करण्यात आले. यासाठी सकाळी ७:४५ वाजता अभिनेत्री आलीय भटसह संपूर्ण राज्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तुफानं आणणारे अमीर खानही आले होते. त्यांनी येताच हातात टिकाव, खोऱ्या घेत एक तास श्रमदान केले. यावेळी स्वयंसेवी संस्था, काँलेज, शाळा, गावकरी, संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी महाश्रमदानात सहभाग घेतला. श्रमदानानंतर त्यांनी प्रत्येकांच्या या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया ऐकल्या. दिलखुलासपणे अमिर खान व अलिया भट यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत नागरिकांशी संवाद साधून ग्रामस्थांची त्यांनी मने जिंकली. महाश्रमदानानंतर एका कोपीत बसून त्यांनी खिचडीचाही आस्वाद घेतला.
मराठवाड्यात दारिद्रय असण्याचे मुख्य कारण पाणीटंचाई आणि दुष्काळ आहे. अमिर म्हणाला, तुमची थोडी मेहनत तुमच्यासह भावी पिढीचे कल्याण करणार आहे.आपले गाव पाणीदार बनले की आपोआप दारिद्रय संपुष्टात येईल. उत्पन्न वाढेल अन् लोक मुंबई, पुणे सोडून तुमच्या गावाजवळील शहरात येतील.लातूरला येणाऱ्याचा ओघ वाढेल. त्याकरिता ग्रामीण भागासह शहरी भागातील जनतेनी ही आतापासूनच पाणलोटची कामे करावी. जेणेकरून भविष्यात दुष्काळाशी सामना करावा लागणार नाही. नवीन स्पर्धा शहराकरिता ही चालू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अगर आप न होते तो हम न होते : अभिनेत्री आलीया भट
ग्रामीण भागातील शेतकरी काबाडकष्ट करुन अन्नधान्य पिकवतो. तुमच्या मेहनतीमुळेच आम्हांला अन्न मिळते. दररोज अन्न खाताना आम्ही कधी याचा विचार केला नाही की हे सर्व येते कोठून? याच्या पाठीमागे कोणाची मेहनत आहे. याची प्रचिती आज मला आली आहे. तुम्ही जे करता, ते दुसरे कुणीही करु शकत नाही. मला तुम्हाला भेटून खुप आनंद झाला. मी प्रार्थना करते देवाला प्रत्येक गाव पाणीदार झाले पाहीजे. जेणेकरून दुष्काळ पुन्हा येणार नाही अन् शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
देशात नदी स्वच्छता मोहीम गरजेची...
देशासह राज्यात नदी जोडो व नद्याची स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. यामुळे देशात मोठा बदल दिसून येईल. शेतीत क्रांती घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र पाणीदार करणे गरजेचे आहे.
टि.व्ही व्दारे पाणी फाऊंडेशनची जनजागृती
देशाच्या दुष्काळग्रस्त भागात म्हणजे महाराष्ट्रात आम्ही सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून वाप्टर कप स्पर्धेच्या द्वारे गावोगावी ही संकल्पना राबवितो.परंतु या उपयुक्त व अवश्यकमोहिमेची माहीती आम्ही दर शनिवारी टि.व्ही च्या द्वारे तुफानं आलंया या कार्यक्रमातून देतो.सर्वत्र याचा प्रसार व प्रचार यूट्यूब, फेसबुक, टिव्हीटरद्वारे देण्यात येत आहे.
विजेत्या गावाना रोख बक्षीस : शरण पाटील
पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत प्रथम, द्वितीय,व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गावाना माजी मंत्री आ. बसवराज पाटील यांच्या वतीने प्रत्येकी १०, ५, ३ लाखांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा शरण पाटील मुरुमकर यांनी केली. यावेळी विविध संघटना, सामाजिक संस्था, विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी, गावकरी आणि तरुण कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.