लातूरमध्ये 'स्पेशल २६' केस; आयकर अधिकारी असल्याचे सांगत भर दिवसा १० लाखाला लुटले!
By राजकुमार जोंधळे | Published: November 8, 2022 07:51 PM2022-11-08T19:51:45+5:302022-11-08T19:55:33+5:30
लातुरात खळबळ! बेडरूमधील राेकड घेऊन केला पाेबारा...
लातूर : आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहाेत, आपल्या फ्लॅटची झाडाझडती घ्यायची आहे, असे सांगत घरात हाती लागलेली दहा लाखांची राेकड दाेघा अज्ञाताने दिवसाढवळ्या पळविल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील मयूरबन काॅलनीतील गाेकुळ अपार्टमेंटमध्ये सुनीता कल्याण भांगे (वय ४५, रा. वंजारवाडी, ता. रेणापूर) हे आपल्या मुलीसाेबत वास्तव्याला आहेत. सकाळी घरातील सर्वच जण कामानिमित्त घराबाहेर पडले. हीच संधी साधत दाेघा अज्ञात व्यक्तींनी साेमवारी ११ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी आहाेत, अशी बतावणी करून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आम्हाला तुमच्या घराची झाडा-झडती घ्यायची आहे. घरात माेठ्या प्रमाणावर पैसे ठेवले आहेत. याची आम्हाला माहिती मिळाली आहे, ते पैसे काेठे आहेत? असे म्हणाले. हे शाेधण्याची आमच्याकडे मशिन आहे. तुम्ही काेणालाही संपर्क करू नका, काेणालाही बाेलण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगत त्या भामट्यांनी सरळ बेडरूममधील कपाटात ठेवलेली ५०० रुपयांच्या नाेटा असलेली दहा लाखांची राेकड घेऊन पाेबारा केला. डाेळ्यांदेखत ही राेकड पळविण्यात आली.
याबाबत सायंकाळी मुलगी घरी परतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. दाेघा लुटारूंनी राेकड पळवून फसविल्याचे मुलीच्या लक्षात आले. त्यानंतर मात्र फिर्यादीसह मुलीलाही घामच फुटला. त्यांनी तातडीने शिवाजीनगर पाेलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलीस निरीक्षक दिलीप डाेलारे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दाेघा अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक सुभाष राठाेड करत आहेत.
लुटालुटीच्या घटनांत वाढ...
दमदाटी करत माेबाईल हिसकावणे, गंठण पळविणे, पाेलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना रस्त्यातच लुबाडण्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहाेत, असे सांगून लुटल्याची घटना लातुरात पहिल्यांदाच घडली असावी. घरात ज्येष्ठ व्यक्ती असल्याची संधी साधत, दिशाभूल करत ताेतयागिरी करुन लुटण्याच्या घटनांत अलीकडे वाढ झाली आहे.